साताऱ्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रदर्शनाचा डंका

२२५ स्टॉल्स, २५ लाखांची थेट विक्री; 'मिलेट' उत्पादनांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद


 स्थैर्य, 10 मार्च, सातारा : सातारच्या पोलीस कवायत मैदानावर ७ ते ९ मार्च दरम्यान आयोजित ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना’ विभागीय प्रदर्शन व ‘पौष्टिक तृणधान्य महोत्सव’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या तीन दिवसीय महोत्सवात केवळ प्रदर्शनावरच भर न देता, थेट खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांसाठी कोट्यवधींच्या बाजारपेठेचे दरवाजे खुले करण्यात आले.

प्रदर्शनात सहभागी २२५ स्टॉल्समधून सुमारे २५ लाख रुपयांची थेट विक्री झाली.  खरेदीदार-विक्रेता संमेलनात विविध कंपन्यांनी उत्पादकांशी ३.२५ कोटी रुपयांचे खरेदी करार केले.  सहभागी सर्व उद्योजकांकडे FSSAI, उद्योग आधार आणि GST परवाने असल्याने ग्राहकांनी गुणवत्तेवर विश्वास दर्शवला.

या प्रदर्शनात जिल्ह्याच्या विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची रेलचेल होती. यामध्ये प्रामुख्याने:
माण-खटावची वैशिष्ट्यपूर्ण ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये. पाटण-जावळीचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ आणि नाचणी. प्रक्रियायुक्त पदार्थ: लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रिय गुळ, मध, माशांचे प्रक्रियायुक्त पदार्थ आणि निर्जलीकरण केलेली फळे-भाज्या. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि बँकिंग सुविधांचे स्टॉल्स.

८ मार्च रोजी आयोजित खरेदीदार-विक्रेता संमेलनात  त्यामध्ये सुनील महांगडे, देशी मार्ट फूड स्टाफ ट्रेडिंग लिमिटेड कंपनी दुबई, दिलीप घोरपडे, घोरपडे ॲग्री एक्सपोर्ट [आखाती देश], संतोष बोबडे पी. आय. पी. ऍग्रो जावळी, जयवंत केंजळे जेके ऍग्रो फलटण, सागर जाधव अष्टभैरव फार्मर प्रोडूसर कंपनी वाई यांच्या सह इतर यांसारख्या मोठ्या निर्यातदारांनी हजेरी लावली. एकूण २२ खरेदीदारांनी २०० विक्रेत्यांशी संवाद साधून पॅकेजिंग आणि लेबलिंगबाबत मार्गदर्शन केले. जागेवरच झालेल्या ३.२५ कोटींच्या करारांमुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ निमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कृषी उद्योजिकांचा गौरव केला व खरेदीदार, निर्यातदार यांच्याशी संवाद साधला.
श्रीमती प्रियाताई शिंदे जिल्हा परिषद सदस्या खटाव जिल्हा सातारा यांनी खरेदीदार विक्रेता संमेलनामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

“सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ११४० उद्योग या योजनेतून उभे राहिले आहेत. ग्रामीण उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी असे महोत्सव दरवर्षी होणे गरजेचे आहेत, असे मत सहभागी उद्योजक व ग्राहकांनी व्यक्त केले.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आणि कृषी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!