फलटण तालुक्यातील गुणवरे येथील प्रतिक आढावची नायब तहसीलदार पदी निवड


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२२ । फलटण । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२० साली घेण्यात येणारी परंतु कोव्हिड १९ मुळे पुढे ढकलल्या परीक्षेमध्ये गुणवरे गावचे सुपुत्र प्रतिक मुकेश आढाव यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये २५४ वी रँक मिळवत उज्ज्वल यश संपादन केले.त्याची नायब तहसीलदारपदी निवड झाल्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करत प्रतिकचे वडील मुकेश कोंडीराम आढाव हे स्वतः गवंडी व बिगारी म्हणून काम करत तर आई महानंदा मोलमजुरी करून प्रतिकला त्यांनी शिक्षण दिले.प्रतिकचा लहान भाऊ दयानंद हा स्वतः खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहे.प्रतिकच्या या यशामध्ये त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा सिंहाचा वाटा असल्याचं प्रतिक मान्य करतो. आपली आजी कमल विठ्ठल वाघमारे हिचे या यशात योगदानही प्रतिक मानतो.

प्रतिकचे इयत्ता १ ली ते इयत्ता ३ री पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवरे या ठिकाणी झाले.पुढील शिक्षणासाठी तो माण तालुक्यातील वडजल या गावी आपल्या मामाकडे गेला.तिथे त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुधोजी हायस्कूल फलटण या ठिकाणी आला आहे.

इयत्ता बारावीनंतर त्यांनी पुणे येथील आनंदराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मेकॅनिकल ब्रँचमध्ये आपले शिक्षण घेतले.२०१७ उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पुढील सहा महिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे(बार्टी) च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून त्यात यश मिळवले.२०१८ ला तिथे त्याने एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.२०१८,२०१९ ला त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या.रेंजर फॉरेस्ट ऑफिसर म्हणूनही त्यांची निवड झाली परंतु पुढील तयारीमुळे तो ग्राऊंडला जाऊ शकला नाही.२०२० ची राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा कोविड १९ मुळे पुढे ढकलली.मार्च २०२१ ला त्याने पूर्व परीक्षा दिली.डिसेंबर २०२१ ला त्याने मुख्य परीक्षा दिली.

त्यात त्यांनी यश मिळवले.२५ एप्रिल २०२१ ला मुलाखत दिली.त्यात अंतिम २९ गुणवत्ता यादीत २५४ रँक मिळवत नायब तहसीलदारपदी त्याची निवड झाली.विद्यार्थी दशेपासूनच प्रतिक हा वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवत आला आहे.इयत्ता दहावीला सुद्धा त्याला ९२% गुण मिळवत त्याने प्रथम क्रमांक मिळवला.कुणी शुभेच्छा देवो अगर न देवो कुणी अभिनंदन करो अगर न करो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अत्त दीप भव स्वयंप्रकाशित व्हा हा विचार व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन प्रतिक प्रयत्न करत राहिला.

त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले,”माझी प्रेरणा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.त्याचबरोबर हलाखीचे दिवस याची जाणीव मला आहे.समाजाला हजारो वर्षांच्या गर्तेतून वर काढण्याचीही ऊर्मी माझ्यात आहे.कोणीही मार्गदर्शक नव्हता पण अत्त दीप भव व शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हाच विचार मला प्रेरणा देत राहिला आहे.कोणतेही यश त्यागाशिवाय व कठोर मेहनतीशिवाय मिळत नाही.केटरिंग असेल, गवंड्याच्या हाताखाली काम असेल, सुरक्षा गार्ड म्हणून काम असेल की बिगारी म्हणून काम असेल याची कधीच मला लाज वाटली नाही.पण यातून उदात्त ध्येय मात्र घेऊन मी माझा प्रवास सुरू केला.

आज मी माझ्यासोबत समाजातील पाच विद्यार्थी घेऊन पुढील तयारी करतोय.एकवेळचं जेवण घेऊन मी तयारी करत राहिलो.बारामतीमध्ये अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.आणि त्याचे यश मला मिळाले.माझ्या यशात माझ्या कुटुंबीयांचा व समाजाचा फार मोठा वाटा आहे.मी यश संपादन करून आलो तेव्हा सर्व समाज, माता- भगिनी माझ्या स्वागतासाठी उभ्या होत्या.त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूंच्या धारा होत्या. हाच सर्वात मोठा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यातील आहे.मला पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी व्हायची इच्छा आहे.तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा देण्याची तयारीही सुरू केली आहे.तेव्हा मी सर्वांचा ऋणी आहे.

प्रतिकच्या या यशाबद्दल सर्व समाजबांधव, मित्र, ग्रामस्थ, नातेवाईक,सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी त्याला शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!