
स्थैर्य, कोळकी दि. ८ : कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रचाराचे वारे जोमाने वाहू लागले असून प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने प्रभागातील ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष गाठी – भेटी, चर्चा यावर यांनी जोर दिला असून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला सत्ता अबाधित राखण्यासाठी मतदारांनी साथ देण्याचे आवाहन ते करताना दिसत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळकी ग्रामपंचायतीवर ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. या सत्ताकाळात गावाचा सर्वांगाने विकास करण्यात लोकप्रतिनिधींना यश आले आहे. गावातील रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, वीजपुरवठा, स्ट्रीट लाईट आदी आवश्यक सुविधा देण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुरु असलेला हा गावाचा विकास असाच पुढे सुरु राहण्यासाठी व समृद्ध गाव म्हणून कोळकीची ओळख अखंड टिकून राहण्यासाठी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता अबाधीत राहणे ग्रामस्थांच्या हिताचे आहे. त्यामुळे मतदारांनी गावाचे व पर्यायाने येथील रहिवाशांचे हित लक्षात घेवून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपली पसंती दर्शवावी. पुढील पाच वर्षात गावाचा निश्चितपणे आणखीन विकास आमच्या मार्फत केला जाईल, असे आश्वासनही सौ. प्राजक्ता काकडे, सौ. वर्षा शिंदे व गणेश शिंदे प्रचारादरम्यान प्रभागातील मतदारांना देत आहेत.