दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
प्रल्हादराव साळुंखे-पाटील तात्यांनी मला व्यावसायिक, सामाजिक व राजकीय जीवनात उभे राहण्यासाठी सदैव पाठबळ दिले आहे. त्यांचा हात सदैव माझ्या पाठीशी असतो. अनेक अडचणींच्या काळात मला तात्यांनी योग्य मार्गदर्शन केले व आजही ते करतात, असे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सुरवडीने आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, अॅड. नरसिंह निकम, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत निंबाळकर, सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील, माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक धनंजय साळुंखे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी मागील साडेचार वर्षांमध्ये खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुरवडीतील विविध विकास कामांपोटी सुमारे ४ कोटी ५० लाखांचा निधी आल्याचे सांगून भविष्यात खासदारांच्या माध्यमातून सुरवडीतील विचाराधीन प्रस्तावित कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील म्हणाले की, माझा ४० वर्षांचा राजकीय प्रवास हा कायम सत्तेच्या विरोधात राहिला आहे. मात्र, मागील साडेचार वर्षांपासून माझे दिवंगत मित्र कै. हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचा मुलगा खासदार झाल्याने फलटण तालुक्यासह संपूर्ण माढा मतदारसंघात कोरोनामुळे मिळालेल्या अत्यंत कमी कालावधीतसुद्धा खासदारांनी उभी केलेली प्रचंड विकासकामे तालुक्यातील जनतेला बघायला मिळाली आहेत. मागील चार वर्षांचा काळ हा माझ्यासाठी व कुटुंबियांसाठी अडचणीचा गेला असला तरीही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी अजूनही पूर्ण ताकदीने व जोमाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उभा राहिलो असून याचा मला सार्थ अभिमान असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू म्हणून भविष्यातही कार्यकर्त्यांसाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जितेंद्र साळुंखे-पाटील यांनी आभार मानले.