स्थैर्य,वेल्हे, दि.१५: किल्ले राजगड (ता.वेल्हे) येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाची पॉवर बॅंक बुरुजावरून दरीच्या बाजूने खाली पडली. ती काढण्यासाठी गेलेल्या अनुराग अनिल राक्षे (वय 20, रा. जोशी मार्ग, भायखळा वेस्ट, मुंबई) या तरुणाचा रविवारी (दि. 14) सकाळी साडेसातच्या दरम्यान पद्मावती माचीवरील बुरुजावरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुंबई येथील सोळा पर्यटकांचा ग्रुप राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. हे सर्व ट्रेकर्स पद्मावती माचीजवळील पद्मावती तलावातील पूर्वेकडील बुरुजावर थांबून सूर्योदयाचा फोटो काढताना अनुरागच्या हातातील पॉवर बॅंक बुरुजावरून दरीच्या बाजूने खाली पडली. अंतर कमी असल्याने पॉवर बॅंक काढता येईल असा विश्वास अनुरागला वाटला. कमी अंतर असल्यामुळे उतरून पॉवर बॅंक हाती घेण्यात यशस्वी झाला खरा पण वर येताना पाय घसरल्याने सुमारे तीनशे फूट खोल दरीत कड्यावरून खाली पडला.
डोक्याला, पायाला व कमरेला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच ग्रुपमधील पर्यटक मित्रांनी 100 नंबरवर फोन करून वेल्हे पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गुंजवणेचे पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, बाळासाहेब पवार, सचिन शिर्के, लक्ष्मण फणसे, पर्यटक प्रसाद कंक, स्वप्नील माने, वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस हवालदार औदुंबर अडवाल, पोलीस कॉन्स्टेबल अभय साळुंके, विकास घोरपडे आदींनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला दरीतून बाहेर काढून उपचारासाठी करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास वेल्हे पोलीस करीत आहेत.