क्रिकेटपटू युवराज सिंहवर गुन्हा दाखल


स्थैर्य,चंदिगड, दि.१५: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह  याच्या विरोधात हरयाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी  एका इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान युवराजने दलित समाजाबाबत एक आक्षेपार्ह कमेंट  केली होती. युवराजची ही कमेंट दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणानंतर युवराजने माफीदेखील मागितली होती. दरम्यान, वकील आणि दलित ह्युमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांच्या तक्रारीनंतर हरयाणा पोलिसांनी युवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान टीम इंडियाचा शिलेदार युजवेंद्र चहलबाबत बोलताना युवीने जातीवादी शब्द वापरले होते. यानंतर युवराजवर त्याच्या या टिप्पणीसाठी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर विश्वचषक विजेत्या या खेळाडूने एक निवेदन जारी करत या प्रकरणी माफीदेखील मागितली होती. दरम्यान, युवराजच्या त्या जातीवादी वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 153, 153 (अ), 505, 295 आणि एससी / एसटी कायद्यासंबंधित कलमांतर्गत युवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास 8 महिन्यांपूर्वी युवराज सिंह आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा हे दोघे इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत होते. त्यावेळी यजुवेंद्र चहलबद्दल बोलताना युवराजने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. दलितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने 2019 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युवराज हा 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धा आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. देशाला दोन विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे 2011 च्या वर्ल्डकममध्ये युवराजला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!