पोल्ट्रीचालकाला गंडा, पुण्यातील दोघांवर गुन्हा, चारचाकीसाठी कर्ज काढून हप्तेही भरायला लावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०४: सातारा शहरातील शनिवार पेठेत राहणार्‍या एका पोल्ट्रीचालकाच्या नावावर कर्ज घेत त्याच्याकडून चारचाकी घेवून त्यालाच धमकावत 4.57 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नितीन जगदीश सचदेव (मुळ रा. सातारा. सध्या रा. अलडोरा महम्मदवाडी, उंड्री, हडपसर, पुणे) आणि राजू खेमाराम चौधरी (रा. शनि मंदिरासमोर, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्‍वर जिजाबा सूळ (वय 39, रा. 876, शनिवार पेठ, सातारा) यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय असून त्यांचे मित्र नितीन जगदीश सचदेव यांना चारचाकी घ्यायची होती. यावेळी नितीन याने ज्ञानेश्‍वर यांना त्यांच्या नावावर चारचाकी घेण्यास सांगत त्याचे कर्जाचे हप्ते मी भरतो, असे सांगितले. यानंतर ज्ञानेश्‍वर यांनी स्वत: 1.80 लाखांचे डाऊन पेमेंट करुन एचडीएफसी बँकेचे 3.50 लाख कर्ज घेतले आणि नितीन याला गाडी घेवून दिली. दरम्यान, नितीन याने कर्जाचे हप्ते भरले नसल्यामुळे ज्ञानेश्‍वर यांच्यावर संबंधित बँकेने 138 अंतर्गत केस दाखल केली. यामुळे त्यांना 1.20 लाख रुपये बँकेत भरावे लागले.

यामुळे ज्ञानेश्‍वर यांनी नितीन याच्याकडे 4 लाख 57 हजार 160 रुपयांची चारचाकीची मागणी केली असता ती त्याने राजस्थान येथील ओळखीच्या इसमाला विकली असल्याचे सांगत गाडी परत मिळणार नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याने ज्ञानेश्‍वर यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचीही धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार 2017 ते आजअखेर घडला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर यांनी शुक्रवार, दि. 2 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नितीन जगदीश सचदेव आणि राजू खेमाराम चौधरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!