‘हिरक महोत्सवी महाराष्ट्र’ संदर्भ ग्रंथाच्या निर्मितीसाठी सकारात्मक चर्चा; महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या नूतन सदस्यांची पहिली बैठक संपन्न


स्थैर्य, फलटण दि.16 : महाराष्ट्र राज्याच्या व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी ‘हिरक महोत्सवी महाराष्ट्र’ असा खास गौरव व 60 वर्षातील विकासाच्या घडामोडींसहित संदर्भ ग्रंथ प्रकाशित करावा अशी महत्त्वपूर्ण चर्चा या मंडळाच्या नवनियुक्त सदस्यांच्या पहिल्या बैठकीत झाली. सभेचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ.सदानंद मोरे व नूतन सदस्य रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रस्तावित केलेल्या या महत्त्वपूर्ण विषयासाठी सर्वच सदस्यांनी व सचिव मीनाक्षी पाटील यांना पाठींबा दर्शविला.

मंडळाच्या नवनियुक्त सदस्यांच्या या पहिल्याच ऑनलाईन बैठकीत सचिव मीनाक्षी पाटील यांनी सर्व नूतन सदस्य व अध्यक्ष यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर प्रास्ताविक भाषणात श्रीमती पाटील यांनी मंडळाने आजवर 60 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांची, ग्रंथ प्रकाशनांची सविस्तर माहिती दिली. राज्याच्या व मंडळाच्याही हिरक महोत्सवी वर्षात अनेक नवे उपक्रम राबविण्यासाठी सदस्यांनी सूचना व सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच मंडळाच्या कार्यपद्धतीची त्यांनी सविस्तर माहिती दिली.

विषय पत्रिकेनुसार प्रख्यात साहित्यिक व ‘अस्मितादर्श’ चळवळीचे प्रमुख डॉ.गंगाधर पानतावणे यांचे समग्र साहित्य दर्शन, श्री चक्रधर स्वामी यांच्या अष्टजन्मताब्दिनिमित्त प्रा.पुरुषोत्तम नागपुरे लिखित ‘सर्वज्ञ श्री चक्रधर : थोर दार्शनिक धर्मज्ञ’, तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, डॉ.अप्पासाहेब पवार, ज्येष्ठ वैचारिक नेते व विचारवंत डॉ.यशवंतराव मोहिते यांचे चरित्र मंडळाच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत प्रकाशित करण्यास यावेळी मंजुरी दिली.

महाराष्ट्राचे शिल्पकार या चरित्रमाले अंतर्गत नव्याने ज्यांची चरित्रे लोकांसमोर व नव्या पिढीसमोर आली पाहिजेत अशा मान्यवरांची यादी सदस्यांनी पुढील बैठकीपर्यंत मंडळाकडे विचारार्थ पाठवावीत असे आवाहनही यावेळी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले. मंडळाचे साहित्य व संस्कृती विषयक होत असलेले कार्य मंडळ सदस्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे असे आवाहनही सचिव मीनाक्षी पाटील यांनी केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देताना सदस्य व ज्येष्ठ पत्रकार तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, मंडळाचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जिल्हा वृत्तपत्रांद्वारे प्रकाशित करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक व आद्य समाजप्रबोधनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची यावर्षी 175 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाच्या बृहद ग्रंथ योजनेतून जांभेकरांच्यावरील विशेष ग्रंथ, तसेच त्यांचे समकालीन व मुंबईच्या विकासाचे पहिले शिल्पकार नाना शंकरशेठ, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, माजी केंद्रीय अर्थमंत्री सी.डी.देशमुख, प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, डॉ.भास्कर लक्ष्मण भोळे, ज्येष्ठ नाटककार गो.पु.देशपांडे, महाराष्ट्राचे माजी मंत्री व फलटण संस्थानचे पुरोगामी अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, प्रसिद्ध मराठी भाषा तज्ज्ञ श्रीमती डॉ.मॅक्सिन बर्नसन यांची चरित्रे महाराष्ट्राचे शिल्पकार योजनेतून प्रसिद्ध करण्याची सूचना रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. यावर्षीच्या नवलेखकांसाठीचे चर्चासत्र, कार्यशाळा यासाठी साताराचे निमंत्रणही बेडकिहाळ यांनी यावेळी दिले.

विषयपत्रिकेवरील विषयानुसार व पुढील कामकाजासाठीच्या चर्चेमध्ये डॉ.नागनाथ कोतापल्ले, श्रीमती नीरजा, डॉ.प्रज्ञा पवार, डॉ.रविंद्र शोभणे, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, प्रा.एल.पी.पाटील, प्रकाश खांडगे, प्रा.प्रदीप पाटील, अरुण शेवते, फ.मु.शिंदे, प्रेमानंद गज्वी, डॉ.आनंद पाटील, नवनाथ गोरे, भारत ससणे, योगेंद्र ठाकुर, डॉ.रणधीर शिंदे यांच्यासह सदस्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला ही दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. राजकारण विरहित या नियुक्तीबद्दल शासनाचे विशेष आभार व्यक्त करुन अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी सर्व नूतन सदस्यांसह पुढील तीन वर्षे या मंडळाचे प्रभावी काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगून या पहिल्या बैठकीचा समारोप केला.


Back to top button
Don`t copy text!