सातार्‍यात पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांकडूनच दहशतीचे राजकारण : आ. रोहित पवार

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी सत्तेचा, पैशांचा आणि दबावाचा वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांकडूनच भाजपच्या नादी लागून दहशतीचे राजकारण होत असल्याचे पाहून अधिक वाईट वाटते, अशी टीका त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.

आ. पवार म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार असतात. सत्तेत असलेले नेते, मंत्री सत्तेचा फायदा घेत पैसा आणि गुंडांचा वापर करून ठराव आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपची सवय लागलेल्या आणि पुरोगामी विचारांच्या परिवारातून आलेल्या नेत्यांनी ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे, अशी टीका त्यांनी केली. मित्रपक्षातील ना. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यालाही पोलिसांकडून ढकलाढकली करण्यात आली. सत्तेचा आणि दडपशाहीचा हा प्रकार असल्याचेही आ. पवार म्हणाले.

जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या आघाडीच्या माध्यमातून लढली जात होती; मात्र आता भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करत आहे. यावर बोलताना आ. रोहित पवार म्हणाले, भाजपकडे पैसा आल्यामुळे सत्तेचा गैरवापर करून पैसा, दबाव आणि दडपशाहीचा वापर केला जात आहे. सोसायट्यांचे ठराव करतानाही हा प्रकार करण्यात आला. सत्तेचा गैरवापर करणे योग्य नाही. भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांच्या विरोधातही पोलिसांच्या मदतीने सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राडा केला. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी केला.

Back to top button
Don`t copy text!