
दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२६ | सातारा |
सुरूर (ता. वाई) येथील बाजारतळावर रात्रगस्तीवर असलेल्या भुईंज पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, पोलिस कॉन्स्टेबल सतीश कदम व होमगार्ड यांचे पथक रात्रगस्त घालत होते. त्यावेळी सुरूरच्या दिशेने जात असताना समोरून विना नंबरप्लेट असलेली दुचाकी येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी दुचाकी थांबवून त्यावरील व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरील व्यक्तींनी पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करत प्रतिकार केला. याचवेळी एका व्यक्तीने हत्याराने पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्यावर वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
या घटनेनंतर भुईंज पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला अटक केली आहे.