कारवाईची भीती दाखवून मजुराकडून पैसे उकळणारा तोतया पोलिसास अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 19 : करंजे येथे मजुरी कामासाठी आलेल्या दाम्पत्याला एका तोतया पोलिसांने कारवाई करण्याचा धाक दाखवून 500  रुपये उकळून पोबारा केला. मात्र, या मजुराच्या प्रसंगावधानाने खर्‍याखुर्‍या पोलिसांनी त्याच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या. संतोष तुकाराम मोरे (वय 29, रा. करंजे नाका, सातारा) असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत संबंधित मजूर शहाजी राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून श्रीकृष्ण कॉलनी, करंजे (सातारा) येथे मजुरीसाठी पत्नीसह पायीच जात आहेत. रविवारी (दि. 19) ते व पत्नी सुरेखा सकाळी 9 च्या सुमारास पायी चालत श्रीकृष्ण कॉलनीकडे मजुरीसाठी निघाले होते. त्यावेळी तेथील मशीन बंद पडल्यानंतर माघारी निघाले होते. दुपारी 1.45च्या सुमारास करंजे नाका रिक्षा स्टॉपजवळ एका पिवळ्या रंगाचा रेनकोट घातलेला इसम तेथे आला. त्याच्या रेनकोटवर ‘मुंबई पोलीस’ असे लिहिले होते. त्या इसमाने या मजुर दाम्पत्यास पोलिस असल्याची बतावणी करून ‘तू तुझा कामावर जाण्याचा पास दाखव.’ असे दरडावले.

मजुराने पास नसल्याचे सांगितल्यावर त्याने मला आधारकार्ड दाखवण्यास सांगितले. आधारकार्ड घरी आहे, असे सांगितले असता त्याने ‘तुम्ही इथेच थांबा. मी लगेच डिपार्टमेंटची गाडी बोलवतो. अशी भिती दाखवली. गाडी बोलवायची नसेल तर 500 रुपये फाईन भर. मी तुला पावती देतो, असे म्हणाल्याने मजुराने त्वरित 500 रुपयांची नोट दिली. त्यानंतर तो पावती न देताच तिथून झेंडा चौकाकडे पायी चालत निघून गेला.

बराचवेळ तेथेच पावतीसाठी वाट पाहणार्‍या मजुराला तेथे दुचाकीवरून जात असणारे दोन पोलीस दिसले. त्याने झालेला प्रकार त्यांना सांगितला व तो इसम झेंडा चौक, करंजे पेठ सातार्‍याच्या दिशेने पायी चालत गेला असल्याचे सांगितले. त्यानंतर दुचाकीवरील दोन्ही पोलिसांनी संबंधित इसमाचा शोध घेऊन त्यास पकडून मजुरासमोर आणले.

संशयीतास मजुराने ओळखल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव संतोष तुकाराम मोरे (वय 29, रा. करंजे नाका, सातारा), असे सांगितले. त्याच्याकडे पोलीस आयकार्डची मागणी करून आपण कोठे नेमणुकीस आहात, असे विचारले असता त्याने मी पोलीस नसल्याची कबुली दिली.

याप्रकरणी फियादीवरून त्याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!