
थेट WhatsApp वर मिळवा
बनावट आधारकार्डच्या आधारे भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला फलटण न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ ऑक्टोबर : बनावट कागदपत्रे आणि आधारकार्डच्या आधारे बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.
बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य
भिलकटी हद्दीतील १८ फाटा परिसरात एक बांगलादेशी महिला बनावट ओळखपत्रांच्या साहाय्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. भारत सरकारची दिशाभूल करून बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून संबंधित महिलेस अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
न्यायालयात गुन्हा सिद्ध
पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांनी तपास पूर्ण करून वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी अभियोक्ता बांदल यांनी प्रभावी बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार वैशाली नेवसे यांनी कामकाज पाहिले. सादर करण्यात आलेले सबळ पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने संबंधित महिलेला दोषी ठरवून दोन वर्षांचा कारावास सुनावला.



