

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचे लोकार्पण आणि १० हजार कोटींच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय भव्य कार्यक्रम १५ मे रोजी साताऱ्यात होणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. 11 मे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या घरांपैकी ५ लाख घरे पूर्ण झाली आहेत. या घरांचे लोकार्पण आणि योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा भव्य कार्यक्रम १५ मे रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, असे निर्देश राज्याचे ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
१० हजार कोटींच्या निधीचे वितरण:
केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी तब्बल ३० लाख घरे मंजूर केली होती, ज्यापैकी ५ लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. याच ५ लाख घरांचे लोकार्पण आणि योजनेसाठी १० हजार कोटींच्या निधीचे वितरण साताऱ्यात होणाऱ्या या सोहळ्यात केले जाणार आहे. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे यजमानपद साताऱ्याला मिळाल्याचा अभिमान असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाला पूर्वतयारीचे सक्त निर्देश:
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी गोरे यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी जागोजागी पंखे व कुलरची व्यवस्था करावी. लाभार्थ्यांसाठी फूड पॅकेटची सोय असावी. वेळ कमी असल्याने प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
लाभार्थ्यांसाठी ४०० बसेसची व्यवस्था:
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, हा कार्यक्रम सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार असून त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. तसेच, मंत्री महोदयांच्या संख्येनुसार हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात येतील. या कार्यक्रमासाठी मोठा मंडप उभारण्यात येणार असून लाभार्थ्यांना आणण्यासाठी ४०० एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी बैठकीत दिली.
या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपाध्यक्ष राजू भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.