येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । पुणे । येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.

बालभारतीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे,  शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित  मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

बालभारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा  विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.

देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना  नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षात  भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी  ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल. दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव  न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री  दीपक केसरकर  यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!