विद्यार्थ्यांची वसतिगृहाबाबत गैरसोय होणार नाही असे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । मुंबई । विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

आज मंत्रालयात मुंबईतील शासकीय वसतीगृह महाविद्यालय, संस्थाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई विभागाच्या सहसंचालक श्रीमती डॉ. सोनाली रोडे, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची वसतीगृहाबाबतची वाढती मागणी लक्षात घेऊन वस्तीगृहाचे कालबद्ध पद्धतीने नियोजन केले पाहिजे. ज्या जुन्या इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या वेळेत दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश कसा मिळेल आणि वसतिगृहाची संख्या कशी वाढवता येईल याचे नियोजन करावे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत सावित्रीदेवी फुले महिला छात्रालय, तेलंग मेमोरियल मुलींचे वस्तीग्रह, मातोश्री शासकीय मुलांचे वसतिगृह,कलिना कॅम्पस ग्रंथालय इमारत याबाबत आढावा घेण्यात आला. याठिकाणी जाऊन पाहणी करून नेमक्या काय अडचणी आहेत याचा आढावा घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!