दैनिक स्थैर्य । दि. 27 नोव्हेंबर 2024 । फलटण । ‘‘दहावीचे शिक्षण घेत असताना हुशार मुलगा देवघारी गेल्यानंतर त्या दुःखातून सावरत आई वडीलांनी व कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथम स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करून समाज्यात आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी स्मृतिदिना निमित्त वृक्षारोपण व शैक्षणिक मदत करण्याचा संकल्प पिंगळे परिवाराने घेतला आहे. त्यांचे कार्य समाज्यासाठी कौतुकास्पद व प्रेरणादायी असून या उपक्रमाची नितांत गरज असून भव्य दिव्य पुण्यस्मरणां पेक्षा असे उपक्रम राबवावेत’’, आवाहन कथाकार, प्रबोधनकार प्रा रवींद्र कोकरे यांनी केले .
म्हसोबानगर (पणदरे) येथे कै. चि. हर्षवर्धन हनुमंत पिंगळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘संस्काराचे देणं’ या विषयांवर व्याख्याते प्रा. रवींद्र कोकरे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले होते.
‘‘आपल्या मुलांच्यावर संस्कार करणे आवश्यक आहे. शिक्षण ही ज्ञानाची शिदोरी आहे. मुलांनी आई वडीलांच्या कष्टाची जाणिव ठेवून वाटचाल केल्यास जीवन पारिपूर्ण होईल. संपत्तीतील वाटा सामाजिक कार्यासाठी वापरावा. ‘देणं’ हेच खरं ‘जगणं’ असून आपण सैदव देत राहावे’’, असा मौलिक विचार प्रा. कोकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुण्यस्मरणदिनानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत असून कार्यक्रमास महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते.