दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण पंचायत समितीचे ‘सभापती निवास’ हे फलटण शहरामध्ये असून या सभापती निवासचे रूपडे आगामी काही महिन्यांमध्ये पालटणार आहे.
पंचायत समितीच्या सभापतींसाठी फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बुरूड गल्ली येथे पंचायत समितीचे सभापती निवासस्थान आहे. या ठिकाणी आता नव्याने भव्य दिव्य अशी इमारत उभी राहत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तळमजला हा संपूर्ण पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच पहिल्या मजल्यावर सभापती यांच्यासाठी राखीव असा ‘मीटिंग हॉल’ तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील म्हणजेच दुसर्या मजल्यावर सभापती यांचे भव्यदिव्य असे निवासस्थान असणार आहे व त्यानंतरच्या वरील तिसर्या मजल्यावर पंचायत समितीचे शासकीय विश्रामगृह असणार आहे.
फलटण पंचायत समितीच्या सभापती निवाससाठी साधारणपणे १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
फलटण पंचायत समितीचे सभापती निवास म्हणजे एकेकाळचे फलटणचे ‘सत्ताकेंद्र’ म्हणून संबोधले जात होते. माजी आमदार व माजी पंचायत समितीचे सभापती स्वर्गीय चिमणराव कदम यांच्या काळामध्ये चिमणराव कदम यांचे वास्तव्य हे सभापती निवासमध्ये कायम असायचे. त्या ठिकाणाहून संपूर्ण तालुक्याचा गाडा चिमणराव कदम हाकत होते. तालुक्यामधील कोणत्याही नागरिक व कार्यकर्त्यांची कामे ही सभापती निवासमधून मार्गी लागली जात होती.