दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२४ | फलटण |
अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज झाली. त्या निमित्ताने फलटण येथे ४०० वर्षांपासून असणार्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम आज आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत सुरू झाले. यावेळी त्यांच्यासोबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले व शेकडो नागरिक, महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी श्रीमंत रामराजे म्हणाले की, आज देशातील नागरिकांसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. आज जनतेच्या मनातील इच्छा प्रभू श्रीरामाचे अयोध्येत मंदिर व्हावे, हे स्वप्न पूर्ण झाले आहे. श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येत संपन्न झाली. यानिमित्ताने फलटण येथे सुमारे ४०० वर्षांपासून असणारे पुरातन असे श्रीराम मंदिर याचा जीर्णोध्दार आज करण्यात आला. माझ्या आजोबांच्या काळात या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला होता. श्रीराम मंदिराबरोबरच श्री दत्त मंदिर व इतर मंदिरांचाही जीर्णोध्दारही यापुढील काळात करण्यात येणार आहे. श्रीराम मंदिराचे शिखर आणि सभामंडपाचे काम करण्यात आले आहे. या मंदिराचे पुरातन स्वरूप जपण्यात येत असून आर्किटेट यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
श्रीमंत संजीवराजे यावेळी म्हणाले की, श्रीराम मंदिर व श्री दत्त मंदिराचा जीर्णोध्दार आज सुरू करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. या मंदिराचे जुने स्ट्रचर न बदलता त्यांना मजबुती कशी येईल, हे पाहिले जाणार आहे. याबरोबरच तालुयातील इतर पुरातन मंदिरांचाही जीर्णोध्दार लवकरच करण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थित असलेले आर्किटेट यांनी सांगितले की, श्रीराम मंदिर व इतर मंदिरांचा जीर्णोध्दार करताना त्यांचे पुरातन रूप अबाधित राखून ही मंदिरे १०० वर्षे कशी टिकतील, याचा आमचा प्रयत्न आहे. श्रीराम मंदिराच्या जीर्णोध्दारास सहा महिन्यांचा कालावधी लागेल.