
स्थैर्य, फलटण, दि.२९ : काल (दि.28) रोजी फलटणच्या तापमानात सुमारे 4 ते 5 अंश सेल्सिअसची अचानक घट होवून दिवसभर ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहिल्याने फलटणकर चांगलेच गारठल्याचे पहायला मिळाले.
ऑक्टोबर महिन्यात हिवाळा सुरु झाला असला तरी अद्याप फलटणच्या तापमानात म्हणावी अशी घट झालेली नव्हती. हवामानाचा अंदाज व्यक्त करणार्या एका वेबसाईटवरील आकडेवारीनुसार काल अखेर संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात फलटणचे कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सियसच्या आसपास होते. शुक्रवारी (दि.27 रोजी) फलटणचे कमाल तापमान 29 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. मात्र काल या तापमानात अचानक 4 अंश सेल्सियसची घट होवून कमाल तापमान 25 अंश सेल्सियस तर किमान तापमान 18 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. याच वेबसाईटवरील अंदाजानुसार आज शहरात किंचित ढगाळ वातावरण राहून कमाल तापमान 28 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिवसभर कमाल तापमानात घट होवून थंड वारे वाहिल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली होती. तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ धडकून ते वायव्य दिशेने सरकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने याआधीच वर्तवला होता.