
फलटण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला. मंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महायुतीचा, तर संजीवराजे, अनिकेतराजे यांच्या हस्ते राजे गटाचा प्रचार शुभारंभ. आता स्टार प्रचारकांच्या सभांकडे लक्ष. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. 27 जानेवारी : फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आता खऱ्या अर्थाने रंगत आली असून, आजपासून प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असून, तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये यापूर्वीच प्रचाराचा शुभारंभ होऊन सक्रिय प्रचारास जोरदार सुरुवात झाली आहे.
महायुतीचा ‘एल्गार’: जयकुमार गोरे, रणजितसिंह मैदानात
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महायुती) च्या प्रचाराचा नारळ नुकताच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे (Jaykumar Gore), माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar), आमदार सचिन पाटील (Sachin Patil) आणि युवा नेत्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर (Adv. Jijamala Naik Nimbalkar) यांच्या हस्ते विविध ठिकाणी फोडण्यात आला. महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली असून, गावोगावी कोपरा सभा आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे.
राजे गटाचे ‘शक्तीप्रदर्शन’: संजीवराजे, अनिकेतराजेंचा झंझावात
दुसरीकडे, राजे गट प्रणित शिवसेनेच्या प्रचाराचे नारळ देखील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या उत्साहात फोडण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (Aniketraje Naik Nimbalkar) आणि पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (Vishwajeetraje Naik Nimbalkar) यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. राजे गटाने आपली पारंपरिक ताकद आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचे जाळे सक्रिय केले आहे.
स्टार प्रचारकांच्या सभांकडे लक्ष!
स्थानिक नेत्यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राज्याच्या दिग्गज नेत्यांच्या सभांची चर्चा रंगू लागली आहे.
महायुती: भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोणते मंत्री फलटणमध्ये येणार?
शिवसेना (राजे गट): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेचे (शिंदे गट) कोणते बडे नेते प्रचारासाठी येणार?
याबाबत कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठी उत्सुकता असून, येत्या काही दिवसांत फलटण तालुक्यात ‘हायव्होल्टेज’ राजकीय ड्रामा पाहायला मिळणार हे नक्की!
