दैनिक स्थैर्य | दि. ०६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील लढवत असलेल्या विधानसभा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक जाहीरनामा (महाराष्ट्र घोषणापत्र) आज प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये बारामतीप्रमाणे फलटण तालुक्याचा विकास करणार असल्याचे मत यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघात एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बारामतीतून अजितदादा पवार, गोंदियामधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, नाशिकमधून ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होत तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन पाटील यांनी फलटण येथे जाहीरनामा प्रकाशित केला.
या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे जाहीर केले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे. भातशेतकऱ्यांसाठी २५ हजार प्रति हेक्टरी बोनस दिला जाणार आहे. शिवाय अडीच लाख नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून बारामतीसाठी आणि पक्षाचा राज्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच लढवत असलेल्या मतदारसंघनिहाय पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सरकार स्थापनेनंतर १०० दिवसात नवीन महाराष्ट्राचे व्हिजन जाहीर करु असे बारामतीतून माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
याशिवाय प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक स्टायपेंड देणार आहे. अंगणवाडी आणि आशा वर्कर कर्मचाऱ्यांना १५ हजार मासिक वेतन, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर आळा, वृध्द पेंशन धारकांना महिन्याला २१०० रुपये अशी आश्वासनेही देण्यात आली आहेत.
महायुतीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यात बदल घडवणार्या योजना जाहीर केल्या. त्या योजना निव्वळ घोषित न करता त्या योजनांची अंमलबजावणी कसोशीने करण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यसरकारने उत्तमपध्दतीने केला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये लाडकी बहीण योजना, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत शिक्षणाचा समावेश, गरीब, मध्यमवर्गीय, युवक, महिलांच्या कल्याणासाठी… या जनतेच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांना फार मोठा प्रतिसाद राज्यातील कानाकोपऱ्यातून मिळाला आहे. विशेष म्हणजे या सर्व योजना कुटुंब असेल किंवा युवक, महिला-भगिनींना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजना जनतेच्या मनात खोलवर गेल्या आहेत असेही सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुमारे ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्रवादी घोषणापत्र असे छापण्यात आले आहे. शिवाय आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि घोषणापत्रांच्या माहितीसाठी ९८६१७१७१७१ हा हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे आदी उपस्थित होते.