
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये उद्भवणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा लागवडीसाठी आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आगामी काळात गंभीर चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि ग्रामपंचायतीच्या किंवा सार्वजनिक जमिनीवर चारा पिकांच्या लागवडीसाठी सविस्तर आर्थिक मापदंडाला सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
वैयक्तिक व सार्वजनिक जमिनीसाठी अनुदान
शासकीय निर्णयानुसार, वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मजुरी आणि साहित्य खर्चाचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायत हद्द किंवा सार्वजनिक मोकळ्या जागेवर एक एकर चारा लागवडीसाठी १ लाख ५५ हजार ३ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या दोन्ही कामांसाठी प्रति दिवस ३१७ रुपये मजुरी दर निश्चित करण्यात आला असून जमीन मशागतीपासून कापणीपर्यंतच्या कामांचा यात समावेश आहे.
पशुपालकांना दिलासा अन् रोजगाराची संधी
या योजनेमुळे दुष्काळ निवारण, पशुधनासाठी सातत्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती असे तिहेरी उद्दिष्ट साध्य होईल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. संबंधित सर्व यंत्रणांनी या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.





