वाजेगाव फाट्यावर अपघातांचे सत्र रोखण्यासाठी प्रशासकीय पावले; पोलीस व एनएचएआयची संयुक्त पाहणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण-पंढरपूर महामार्गावरील वाजेगाव फाटा येथे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली असून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. १८ नोव्हेंबर : फलटण-पंढरपूर महामार्गावरील वाजेगाव फाटा (ता. फलटण) येथे वारंवार अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांचे अनमोल जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आज फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकाऱ्यांकडून अपघातप्रवण क्षेत्राची संयुक्त पाहणी करण्यात आली.

वाजेगाव फाटा परिसरातील सुरक्षेचा आढावा

वाजेगाव फाटा परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार आरकेसी प्रा. लि. कंपनीचे काम पाहणारे गोरख गोडसे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलावून अपघातांची कारणे व संभाव्य धोके याबाबत चर्चा करण्यात आली.

तातडीने करावयाच्या उपाययोजना

यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना नियमानुसार स्पीड ब्रेकर अथवा रंबलर स्ट्रिप बसविणे, अपघातप्रवण क्षेत्राचे रिफ्लेक्टिव्ह फलक लावणे, रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी स्ट्रीट लाईट व ब्लिंकर बसविणे, रस्त्यालगतची झाडे व झुडपे छाटणे, जोडरस्त्यावर सूचना फलक लावणे आणि रोड मार्किंग व झेब्रा क्रॉसिंग स्पष्ट करणे आदी उपाययोजना तातडीने करण्याबाबत एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना सूचना व विनंती करण्यात आली. प्राधिकरणाचे अधिकारी यांनी या उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!