फलटण शहरी दुमदुमला विठूनामाचा गजर!; उत्साही वातावरणात माउलींचे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 जुलै 2024 | फलटण | कपाळी गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ, डोक्यावर तुळशीचे वृंदावन असा वैष्णवांचा मेळा आज ऐतिहासिक फलटण नगरीत विसावला. तरडगाव येथील एक दिवसांचा मुक्काम आटोपून आज फलटण येथे वैष्णवांचा मेळा विसावला. यामुळे शहराच्या कानाकोपर्‍यात विठुनामाचा गजर दुमदुमला असल्याचे आढळून आले.

शहराच्या सीमेवर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, उपविभागीय पाीलीस अधिकारी राहुल धस, मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी यांनी माउलींचे स्वागत केले.

श्रीराम मंदिर येथे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्याजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजघराण्यातील कुटुंबिय व तालुक्यातील मनीवार यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.

यावर्षी वारकर्‍यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावर्षी भरपूर गर्दी आहे. पाउसमान बर्‍यापैकी झाल्यामुळे शेतकरी विठुरायाच्या भेटीसाठी आतूर झाले असल्याचे आढळून आले. फलटण शहराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सगळीकडे माउली, माउली आणि विठूरायाचा गजर सुरु असल्याचे दिसत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पावसासाठी रेड अ‍ॅलर्ट दिला असला तरी फलटण शहरात तुरळक पाऊस झाल्याने प्रशासनामार्फत योग्य ती दक्षता घेतली गेली आहे.


Back to top button
Don`t copy text!