फलटण तालुक्याला लाभलेला हिरा : आमदार दीपक चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 30 ऑक्टोबर 2023 | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त जर आ.दिपक चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर नक्कीच आमदार दीपक चव्हाण म्हणजे फलटण तालुक्याला लाभलेला एक हिराच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

2009 साली मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा नव्याने आरक्षित मतदारसंघ अस्तित्वात आला. खरंतर मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर फलटणचा आमदार कोण होणार? याबाबत विविध चर्चा होत असताना; विविध कार्यकर्त्यांच्या नावाची शक्यता वर्तविली जात असताना ऐनवेळी दीपक चव्हाण यांचे नाव जाहीर झाले व त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये दीपक चव्हाण हे आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. त्यानंतर आज अखेर म्हणजे सलग 14 वर्षे जवळपास तीन टर्म दीपक चव्हाण आमदार म्हणून मतदार संघाचे नेतृत्त्व करीत आहेत. फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक काळ राहिलेल्या आमदारांमध्ये दीपक चव्हाण यांची नोंद कायम राहणार यात कसलीही शंका नाही

आमदार दीपक चव्हाण हे पूर्वी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत होते. फलटण येथे असणार्‍या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथेही त्यांनी सेवा बजाली आहे. त्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाल्यावर त्यांनी मतदार संघाचा विकास करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यासह मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता आमदार दीपक चव्हाण लोकप्रतिनिधी म्हणून मोठ्या जबाबदारीने आपली भूमिका चोख बजावत आहेत.

आमदार दीपक चव्हाण यांचे नेतृत्व म्हणजे एकदम शांत व संयमी आहे. राजकारणामध्ये आल्यापासून आपले स्वच्छ चरित्र व शांत – संयमी स्वभाव त्यांनी सोडलेला नाही. राजकारणामध्ये सक्रीय असतानाच दुसरीकडे त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वांपार चालत आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली आहे.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये आमदार दीपक चव्हाण हे सातत्याने कार्यरत असतात. आपले कार्य बजावताना कोणताही कमी-जास्तपणा मनामध्ये न ठेवता ते कार्यरत असतात. मतदार संघातील कोणत्याही कार्यक्रमाला दीपक चव्हाण यांची हजेरी प्राधान्याने असते. मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी, वाहतूक अशा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत एक ना अनेक समस्यांना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात ते न्याय देण्यात यशस्वी ठरले आहेत.

अशा या शांत व संयमी नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना !


Back to top button
Don`t copy text!