
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण एसटी आगारातील बारामती स्टँडवरील संरक्षक भिंत पडून वर्ष उलटले तरी दुरुस्ती झालेली नाही. यामुळे चोरी आणि अपघाताच्या घटना वाढल्याने प्रवाशांत संताप आहे.
**स्थैर्य, फलटण, दि. २१ नोव्हेंबर :** फलटण एसटी डेपोमधील बारामती स्टँडवरील संरक्षक भिंत बसच्या धडकेने पडून जवळपास एक वर्ष लोटले आहे. मात्र, अद्यापही या भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आगार प्रमुखांच्या या उदासीनतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
**चोरी आणि टवाळखोरीत वाढ**
या स्थानकावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या संख्येने ये-जा करतात. बस पकडण्याच्या घाईगडबडीत असलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर चोरी करून या पडक्या भिंतीतून सहज पसार होत आहेत. तसेच, येथे अपघात आणि टवाळखोरीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
**प्रशासनाचे दुर्लक्ष; संघटनेचा पाठपुरावा अपयशी**
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने एक वर्षापूर्वीच निवेदन देऊन ही भिंत तातडीने बांधण्याची मागणी आगार प्रमुखांकडे केली होती. संघटनेने या समस्येबाबत वारंवार स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाला काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र दिसत असून, प्रशासन नेमक्या कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.



