
थेट WhatsApp वर मिळवा
फलटणच्या डेक्कन चौकातील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपरिषदेने सात दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
स्थैर्य, फलटण, दि. २० नोव्हेंबर : फलटण शहरातील डेक्कन चौकातील उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेचे पथक दाखल झाले होते. मात्र, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जागामालकांनी सात दिवसांची लेखी मुदत मागितल्याने प्रत्यक्ष कारवाई तूर्तास थांबवण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
डेक्कन चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगत अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी पाऊल उचलले.
मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास कारवाई
नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जागामालकांशी चर्चा झाली. यावेळी जागामालकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची लेखी विनंती केली. अतिक्रमण विभागप्रमुख विनोद यादव यांनी ही माहिती दिली. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास नगरपरिषद पुढील कायदेशीर कारवाई करेल. तसेच, शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम पुढेही सुरू राहील, असे यादव यांनी स्पष्ट केले.





