स्थैर्य, मुंबई, दि.2 : फलटण तालुक्यासह बारामती, माळशिरस या भागात अनेक कापूस उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत फलटणला शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार दीपक चव्हाण बोलत होते.
मागच्या काळामध्ये फलटण, बारामती, माळशिरस या भागात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादक शेतकरी होता. त्यावेळी फलटणला कापूस पणन महासंघ होता. त्यानंतर कापूस उत्पादक शेतकरी संघ निर्माण करुन या शेतकर्यांना सभासद करुन घेण्यात आले. परंतू त्यांना आजवर पणन महासंघाने कोणताही लाभांश दिलेला नाही. त्यानंतर काही कारणांमुळे या भागातील कापूस उत्पादन कमी झाले. अलिकडील काळात या भागात पुन्हा कापसाचे उत्पादन वाढले असून या शेतकर्यांसाठी फलटणला पुन्हा कापूस खरेदी केंद्र शासनाने जाहीर करावे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली.
शेतकरी कर्जमाफीवर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, 19 हजार कोटीची कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने दिली असून त्याचा लाभ योग्य शेतकर्यांना झाला आहे. मात्र नियमित कर्जदारांना देखील कर्जामध्ये सवलत देणे आवश्यक असून यासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेले 50 हजार रुपयांचे अनुदान तातडीने देण्यात यावे. अन्यथा प्रामाणिक कर्जदारांमध्ये चुकीचा संदेश जावून थकबाकीदारांची संख्या आगामी काळात वाढू शकते. शिवाय या कर्जमाफीमध्ये कॅश क्रेडीट कर्जाचाही समावेश करण्यात यावा, अशीही मागणी आमदार चव्हाण यांनी यावेळी केली.
यावेळी कृषीपंप विज जोडणी विषयावर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, मागच्या सरकारने शेतकर्यांना वीज कनेक्शन दिले नव्हते. मात्र विद्यमान सरकारने या कामात गती आणली आहे. वीज जोडणी योजनेनुसार थ्री फेस पासून 600 मीटरच्या अंतरातील विजजोडणी लगेच होणार असून 600 मीटरच्या पुढील अंतरावर सौर पंप देण्यात येणार आहेत. तथापी विशिष्ठ भौगोलिक परिस्थितीत सौर पंपावर मर्यादा येवू शकते त्यामुळे सौर ऊर्जा की पारंपारिक ऊर्जा द्वारे वीज जोडणी घ्यायची हे ग्राहकासाठी पर्यायी ठेवावे, असेही मत आमदार चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कोरोनाच्या संकटाला यशस्वीपणे सामोरे गेल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार बरोबरच सातारा जिल्ह्यातील शासकीय अधिकार्यांचे आमदार चव्हाण यांनी आवर्जून अभिनंदन करुन राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचेही आभार मानले.