
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून फलटणमध्ये मंजूर झालेल्या ‘वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालया’चे रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. यामुळे साताऱ्याला जाणाऱ्या पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, फलटणकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १३ फेब्रुवारी : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन वैभवात आता आणखी एका ऐतिहासिक सुवर्णपानाची भर पडत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व सततच्या पाठपुराव्यातून फलटण येथे मंजूर झालेल्या ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ (Civil Court, Senior Division) न्यायालयाची आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.
प्रशासकीय दृष्टिकोनातून हा एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय असून, या बहुप्रतिक्षित न्यायालयाचे उद्घाटन येत्या रविवारी दिमाखात पार पडणार आहे.
असा असेल भव्य उद्घाटन सोहळा
दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत पार पडणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते या नूतन न्यायालयाचे उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाला सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अनिल एल. पानसरे, न्यायमूर्ती श्री. राजेश एस. पाटील, न्यायमूर्ती श्री. संजय ए. देशमुख आणि न्यायमूर्ती श्री. रणजितसिंह राजा भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अरविंद शं. वाघमारे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ना. जाधव आणि फलटणचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्या वतीने या कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.
पक्षकार आणि वकिलांची मोठी सोय; ‘जिल्हा’ निर्मितीचे स्वप्न दृष्टिपथात
वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांच्या कामकाजासाठी आजवर फलटण आणि परिसरातील पक्षकारांना तसेच वकिलांना साताऱ्याला खेटे मारावे लागत होते. यात त्यांचा मोठा वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही मोठी गैरसोय आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी शासन आणि प्रशासन दरबारी अत्यंत प्रभावीपणे पाठपुरावा केला. त्यांच्या याच सकारात्मक प्रयत्नांना आता मोठे यश आले असून, हे न्यायालय फलटणमध्येच सुरू होत असल्याने पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, नुकतेच फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यापुर्वीत मंजुर झालेले वरिष्ठ स्तर न्यायालयाची आता प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने, ‘फलटण जिल्हा’ निर्मितीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे, त्या दिशेने पडलेले हे अत्यंत भक्कम आणि आश्वासक पाऊल मानले जात आहे.

