फलटणमधील संत गाडगेबाबा समाजमंदिराच्या वापराबाबत तक्रार; चौकशीची मागणी

कसबा पेठेतील संत गाडगेबाबा समाजमंदिराचा खासगी व्यवसायासाठी वापर होत असल्याची तक्रार करण्यात आली असून, चौकशी करून ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याची मागणी आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : कसबा पेठेतील परीट गल्ली येथील संत गाडगेबाबा समाजमंदिराचा खासगी व्यावसायिक कामांसाठी वापर केला जात असल्याची तक्रार फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. गणेशमूर्तींचे रंगकाम तसेच इस्त्रीच्या व्यवसायासाठी समाजमंदिर आणि तेथील विजेचा वापर होत असल्याचा दावा तक्रार अर्जात करण्यात आला असून, याची सर्वसमावेशक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेशमूर्तींच्या कामामुळे त्रास होत असल्याचा दावा

तक्रार अर्जानुसार, गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने अगोदर बाहेरून गणेशमूर्ती आणून समाजमंदिरात त्यांचे रंगकाम आणि फिनिशिंग केले जाते. हे काम दिवसासह रात्रीही सुरू राहत असल्याने मशीनचा आवाज आणि रंगाच्या वासाचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या कामासाठी समाजमंदिरातील विजेचा वापर केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. समाजमंदिर निवासी भागात असल्याने या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

खासगी व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी

समाजमंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रीचा खासगी व्यवसाय केला जात असून, त्यासाठीही तेथील विजेचा वापर होत असल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. या सर्व बाबींची नगरपरिषदेने चौकशी करून योग्य दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा समाजमंदिर सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध व्हावे, अशी मागणीही तक्रारदारांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Back to top button
Don`t copy text!