दैनिक स्थैर्य | दि. २३ जुलै २०२४ | फलटण |
राज्य परिवहन (एस. टी.) फलटण आगाराने आषाढी वारीमध्ये दि. ६ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या यात्रा कालावधीमध्ये जादा बसेसचे नियोजन करून वारकरी भाविकांना सुरक्षित व वक्तशीर सेवा पुरवून विक्रमी उत्पन्न मिळवले.
एस.टी. बसेस एकूण ५५ हजार किलोमीटर चालवून रुपये २३,१०,०००/- एवढे उत्पन्न मिळविले. प्रति किलोमीटर उत्पन्न रु. ४१.५० तसेच एकूण ११२ बसेसचा वापर करून एकूण ५८९० फेर्या करून भारमान ६५% मिळवले. एकूण ३६,८०० प्रवाशांची वाहतूक केली.
फलटण आगाराच्या पंढरपूर यात्रेतील यशस्वी कामगिरीबद्दल विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी फलटण आगाराचे अभिनंदन केले आहे.
फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापिका सोफिया मुल्ला व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रोहित नाईक यांनी फलटण आगारातील सर्व चालक-वाहक, कार्यशाळा कर्मचारी तसेच पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही उज्ज्वल कामगिरी केल्याचे प्रतिपादन केले.