
फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकींसाठी ‘MH-53-E’ मालिका ९ जुलैपासून सुरू. आकर्षक क्रमांकासाठी वाहनधारकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ५ जुलै : फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांसाठी ‘MH-53-E’ ही नवीन मालिका ९ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकीसाठी आकर्षक किंवा पसंतीचा क्रमांक हवा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली असून, नियमानुसार फी भरून पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येणार आहे.
‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर क्रमांक
वाहन प्रणाली ४.० अंतर्गत या नवीन मालिकेतील ०००१ ते ९९९९ पर्यंतचे क्रमांक दिले जातील. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार या आकर्षक क्रमांकांचे वाटप होणार आहे. यासाठी वाहनधारकांना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्डची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
चारचाकी वाहनांसाठी तिप्पट शुल्क
जर एखाद्या चारचाकी वाहनधारकाला या दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक हवा असेल, तर त्यांना नियमानुसार तिप्पट फी भरावी लागेल. यासाठी ९ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चारचाकी वाहनांचे अर्ज व धनाकर्ष स्वीकारले जातील. दुचाकी वाहनांसाठीचे अर्ज देखील याच वेळेत स्वीकारण्यात येतील. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास तो क्रमांक दिला जाईल.
१८० दिवसांत नोंदणी अनिवार्य
आकर्षक क्रमांक मिळवण्यासाठी अर्जासोबत वैध ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पिन कोड देणे बंधनकारक आहे. तसेच, पसंतीचा आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसांच्या आत संबंधित वाहनाची नोंदणी करणे कायदेशीररीत्या बंधनकारक राहील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांनी दिली आहे.