फलटण: तडीपारीचे उल्लंघन करणारा संशयित जेरबंद; पोलिसांचा दणका


सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या संशयिताला फलटण शहर पोलिसांनी बीएसएनएल परिसरातून पाठलाग करून जेरबंद केले.

स्थैर्य, फलटण, दि. ८ मे : सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांतून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या एका संशयिताला फलटण शहर पोलिसांनी बीएसएनएल ऑफिस परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि. ७ मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे आणि त्यांचे डी. बी. पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी बीएसएनएल ऑफिस परिसरात एक तडीपार संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतला. यावेळी सोनल गणेश इंगळे ऊर्फ ढोबळ्या (वय २१, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) हा संशयित पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून त्याला जेरबंद केले. या संशयिताला सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

विनापरवानगी शहरात प्रवेश करून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस हवालदार संतोष नाळे, पोलीस अंमलदार जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.


Back to top button
Don`t copy text!