फलटण: नीरा खोऱ्यात ६८.७० टक्के पाणीसाठा – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नीरा प्रणालीतील भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणांत ३३.२० टीएमसी (६८.७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 22 जुलै : नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. सध्या भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांमध्ये एकूण ३३.२०४ टीएमसी म्हणजेच ६८.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.

धरणांमधील सद्यस्थिती

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, नीरा खोऱ्यातील चारही धरणांमध्ये मिळून ३३.२०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये वीर धरण सर्वाधिक ९०.७३ टक्के भरले असून त्यात ८.५३६ टीएमसी साठा आहे. भाटघर धरणात १४.१३५ टीएमसी (६०.१४ टक्के), नीरा देवघर धरणात ७.९६५ टीएमसी (६७.९१ टक्के) आणि गुंजवणी धरणात २.५६७ टीएमसी (६९.५६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. या चारही धरणांत मिळून एकूण १.६९८ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे. मागील वर्षी याच काळात या धरणांमध्ये ३९.५६० टीएमसी (८१.८५ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.

पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि विसर्ग

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सातत्याने सुरू आहे. चोवीस तासांत गुंजवणी धरण क्षेत्रात सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर क्षेत्रात ४४ मि.मी., भाटघर क्षेत्रात ३० मि.मी. आणि वीर क्षेत्रात १४ मि.मी. पाऊस पडला आहे. तसेच, बारामतीमध्ये १४ मि.मी., पिंपरा व वडगाव येथे प्रत्येकी १० मि.मी. पाऊस झाला आहे. शेती आणि इतर वापरासाठी नीरा डाव्या कालव्यातून ८२७ क्युसेक्स आणि नीरा उजव्या कालव्यातून १,५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Back to top button
Don`t copy text!