दैनिक स्थैर्य | दि. 03 ऑक्टोबर 2024 | फलटण | फलटण शहरातील श्रीमंत संजीवराजे नगर, हडको कॉलनी, गोळीबार मैदान, विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय, बारावबाग परिसरामध्ये तब्बल दोन हजार हुन अधिक कुटुंब राहत आहेत. या परिसरात नागरिकांना नगरपरिषदेच्यावतीने नियमित व योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही. या सोबतच पाणी सोडण्याची वेळ सुद्धा नियमित नसल्याने फलटण नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागावर हंडा मोर्चा काढत पाणी पुरवठा विभागाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी दिला आहे.
युवा नेते राहुल निंबाळकर यांनी फलटण नागपरिषदेच्या प्रभाग नंबर १२ म्हणजेच श्रीमंत संजीवराजे नगर, हडको कॉलनी, गोळीबार मैदान, विद्यानगर, महाराजा मंगल कार्यालय, बारावबाग या परिसरातील नागरिकांच्या वतीने पाणी पुरवठा सुरळीत होण्याबाबत फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यानंतर बोलताना राहुल निंबाळकर बोलत होते.
डिसेंबर २०२१ पासून फलटण नगरपरिषदेवर प्रशासक राज आहे. सर्वसामान्य फलटणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक नगरपरिषदेत नाहीत. यामुळे पालिका अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिला नाही. पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत या पूर्वी अनेक वेळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. परंतु तरी सुद्धा यावर तोडगा निघू शकला नाही. मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या वेळी फक्त सुधारणा होते त्यानंतर जैसे थी परिस्थिती होत असल्याने आम्ही पाणी पुरवठा विभागाला टाळे ठोकणार असल्याचे मत यावेळी निंबाळकर यांनी व्यक्त केले.