
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याची भीती दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयितावर पॉक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑक्टोबर : अंगात भूत शिरल्याची भीती दाखवून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना फलटण शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सौरभ नाना मदने (रा. बुधवार पेठ, फलटण) याच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जादूटोण्याची भीती आणि अत्याचार
संशयित सौरभ मदने याची पीडित मुलीच्या कुटुंबासोबत ओळख होती. त्याने मुलीच्या अंगात भूत शिरल्याचे सांगून जादूटोणा करत ते काढल्याचा बनाव केला. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत त्याने मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने निरगुडी (ता. फलटण) येथील एका जुन्या घरी नेले. तेथे आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले आणि हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली.
पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल
बदनामी आणि संशयिताच्या भीतीने पीडित मुलगी घरातून निघून वाई येथे गेली होती. तेथील एका अज्ञात व्यक्तीने तिला वाई पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिसांनी संशयिताविरुद्ध पॉक्सो (POCSO) आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यासह इतर गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.





