
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील माळजाई मंदिर परिसरामागील रस्त्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढला आहे. यामुळे महिला भाविकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑक्टोबर : फलटण येथील माळजाई मंदिर आणि उद्यान परिसराच्या पाठीमागील रस्त्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढल्याने दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविक आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढवावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
महिला आणि भाविकांची गैरसोय
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान परिसराचे गेल्या दोन वर्षांत सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे शहर व तालुक्यातील असंख्य नागरिक, महिला आणि लहान मुले येथे मोठ्या संख्येने विरंगुळ्यासाठी येतात. मात्र, दररोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर काही मद्यपींचा वावर असतो. यामुळे मंदिरात दर्शनासाठी तसेच कुटुंबासह फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पोलिसांच्या गस्तीची आवश्यकता
माळजाई मंदिर हा परिसर धार्मिक श्रद्धेचा आणि नागरिकांना शांततेचे वातावरण देणारा आहे. सायंकाळच्या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने सायंकाळी आठ ते दहा या वेळेत नियमित गस्त वाढवावी आणि आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





