
फलटणमधील लक्ष्मीनगर येथे स्टेट बँक शेजारी गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिक आणि दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ जुलै : फलटण शहरातील लक्ष्मीनगर भागातील अक्षत प्लाझा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शेजारी गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकीस्वारांची मोठी कसरत
गटाराचे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. विशेषतः दुचाकी चालकांना या घाण पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता निसरडा झाल्याने येथे किरकोळ अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गटार व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.