दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२३ | फलटण | जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत. आज फलटणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाड पंढरपूर महामार्गावर चक्काजाम करण्यात आला होता. यावेळी शेकडो मराठा बांधवानी चक्काजाममध्ये सहभाग घेत मराठा आरक्षण मिळण्याची मागणी जोरात केली. “आरक्षण आमच्या हक्काचे; नाही कुणाच्या बापाचे” “अरे कोण म्हणते देत नाही; घेतल्याशिवाय राहत नाही” “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अश्या विविध घोषणा देत सर्वच राज्यकर्त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
महाड पंढरपूर महामार्गावरील फलटणमधील नाना पाटील चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक व शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. आज फलटण शहरासह तालुक्यातील विविध शाळा, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. आंदोलन स्थळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनाद करण्यात आला होता.
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यामध्ये आजपर्यंत विविध राज्यकर्त्यांना आपण निवडून दिले आहे; तरीसुद्धा कुणीही मराठा आरक्षण आपल्याला देऊ शकले नाही. राज्यामध्ये जर विचार केला तर सुमारे ७०% आमदार व खासदार हे मराठा आहेत; आपणच त्यांना निवडून देत आहोत. तरी सुद्धा कोणीही मराठा आरक्षणावर ठोस पावले उचलण्यास तयार नाही. यापुढे कोणताही राजकीय पक्ष म्हणून नाही तर मराठा म्हणून आपण एकत्र आले पाहिजे. यापुढे कोणत्याही ठिकाणांहून आपल्याला कोणत्याही मराठा बांधवानी हाक दिली तर मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. ह्या राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये; असे सुद्धा यावेळी मत व्यक्त केले गेले.