फलटण विधानसभा मतदार संघात सन 1980 पासून आहे आमदारकीचा हॅट्रीक पॅटर्न

जाणून घ्या या मतदारसंघातील मतप्रवाहाचा मागोवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 28 सप्टेंबर 2024 | फलटण | रोहित वाकडे । महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. यानिमित्ताने राज्यपातळीपासून ते गाव पातळीपर्यंत राजकीय घमासान सुरु झाले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात देखील राजकारण तापू लागले असून आमदारकीची माळ मिळवण्यासाठी सत्ताधारी, विरोधक, इच्छुक अशा सर्वांनीच वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत. आगामी निवडणूकीत पुढे काय होईल? हे पाहणे उत्सुकतेचे असले तरी यापूर्वी फलटण विधानसभा मतदारसंघात दिग्गजांनी एकमेकांशी भिडून झालेल्या लढती देखील अतिशय रंजक आहेत. फलटण विधानसभा मतदारसंघात सन 1980 पासून आमदारकीचा हॅट्रीक पॅटर्न प्रस्थापित झाला आहे. सन 1980, 1985 व 1990 अशा सलग 3 टर्म चिमणराव कदम, सन 1995, 1999 व 2004 अशा सलग 3 टर्म श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि सन 2009, 2014, 2019 अशा सलग 3 टर्म दीपक चव्हाण यांनी विधानसभेवर हॅट्रीक आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे.

आजवर 15 वेळा झालेल्या फलटण विधानसभा निवडणूकीत मतदारांमध्ये बहुतांश प्रमाणात पुरोगामी विचारांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा प्रभाव दिसून येतो. 15 पैकी 6 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर 5 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. 2 वेळा अपक्ष उमेदवार तर 1 वेळा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आणि 1 वेळा तत्कालिन आणीबाणी विरोधात उभ्या राहिलेल्या जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले होते.

संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी तत्कालीन मुंबई राज्याच्या अंतर्गत सन 1952 आणि सन 1957 साली विधानसभा सार्वत्रिक निवणूक पार पडली. त्यावेळी फलटण आणि माण असा संयुक्त विधानसभा मतदार संघ अस्तित्वात होता व या मतदार संघातून दोन आमदार निवडून जात असत. सन 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर सन 1962 साली फलटण विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली. सुरुवातीला फलटण तालुक्यातील सर्व गावे व खंडाळा तालुक्यातील काही गावांसह फलटण – खंडाळा विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यात आली होती. त्यानंतर सन 2008 साली झालेल्या मतदार संघांच्या पुर्नरचनेनंतर फलटण विधानसभा मतदारसंघास कोरेगांव तालुक्यातील वाठार स्टेशन महसूल मंडळाचा समावेश करण्यात येवून नव्याने फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघ अशी रचना झाली. तेव्हापासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. लोकसभा मतदार संघांच्या रचनेनुसार सुरुवातीला सातारा लोकसभा मतदारसंघात व पुढे सन 2009 पासून या मतदारसंघाचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात करण्यात आला.

राजघराण्याकडे सर्वाधिक काळ सत्ता…

सन 1952 पासून ते 2024 पर्यंतच्या 72 वर्षांच्या काळात सर्वाधिक 42 वर्षे फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याकडे आमदारकीची सत्ता राहिली आहे. यातील विशेष लक्षणीय बाब म्हणजे गत सलग 30 वर्षांपासून मतदार संघावर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.

स्वतंत्र भारतातील पहिली विधानसभा निवडणूक : सन 1951

सन 1951 सालच्या पहिल्या विधानसभा निवणूकीत फलटण माण विधानसभा मतदारसंघात 2 जागांसाठी दिनांक 26 मार्च 1952 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत तब्बल 99.14% इटके लक्षणीय मतदान झाले. 91 हजार 163 मतदारांपैकी 90 हजार 379 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. निवणूक रिंगणात असलेल्या एकूण 7 उमेदवारांमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले उमेदवार श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना 31 हजार 633, दुसरे उमेदवार गणपतराव तपासे यांना 26 हजार 887, कामगार किसान पक्षाचे कृष्णा नलावडे यांना 11 हजार 864, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सदाशिवराव बंदिसोड यांना 7 हजार 856, अपक्ष उमेदवार बाबुराव सातपुते यांना 5 हजार 33, अपक्ष शामराव जगदाळे यांना 3 हजार 966, सोशालिस्ट पार्टीचे बापूराव करचे यांना 3 हजार 140 मते मिळाली. यात सर्वाधिक मतांच्या पहिल्या दोन उमेदवारांना अर्थात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व गणपतराव तपासे यांना विजयी घोषित करण्यात आले.

विधानसभा निवडणूक : सन 1957

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ऐन जोमात असताना सन 1957 साली विधानसभा निवडणूक पार पडली. या क्रांतिकारी वातावरणाचा परिणाम फलटण विधानसभा मतदारसंघातही दिसून आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार हरिभाऊ निंबाळकर यांना 43 हजार 307 तर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सदाशिवराव बंदिसोड यांना 37 हजार 237 मते मिळाल्याने या दोघांची आमदार पदावर वर्णी लागली. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे उमेदवार श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना 31 हजार 764 व गणपतराव तपासे यांना 25 हजार 822 मते मिळाल्याने पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीसाठी 1 लाख 38 हजार 130 नागरिकांनी मतदान केले होते.

विधानसभा निवडणूक : सन 1962

सन 1962 साली पार पडलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणूकीत तिरंगी लढत पहायला मिळाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून हरिभाऊ निंबाळकर व स्वतंत्र पार्टीकडून (हा पक्ष भारतीय राजकारणात सन 1959 ते 1974 या कालावधीत अस्तित्वात होता)विष्णू कुंडलकर हे उमेदवार उभे होते. त्यावेळी मतदारसंघात 71 हजार 122 इतके मतदार होते. दि.19 फेब्रुवारी 1962 रोजी झालेल्या मतदानावेळी 48 हजार 43 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. निकालाअंती 33 हजार 741 इतकी भरघोस मते मिळवत श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर या निवडणूकीत 24 हजार 532 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. हरिभाऊ निंबाळकर यांना 9 हजार 209 तर विष्णू कुंडलकर यांना 2 हजार 594 इतकी मते मिळाली होती.

विधानसभा निवडणूक : सन 1967

सन 1967 साली झालेली फलटण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणूकीत तब्बल 6 उमेदवार रिंगणात होते. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून उभे असलेले कृष्णचंद्र भोईटे व अपक्ष उमेदवार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर या दोघांच्यातच प्रमुख लढत होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बाजीराव जगताप, अपक्ष म्हणून बी.ए.खरात, डब्ल्यु.व्ही.पवार, आर.जी.चव्हाण हे अन्य उमेदवार या निवडणूकीत आपले नशिब अजमावत होते. 21 फेब्रुवारी 1967 रोजी झालेल्या मतदानावेळी 73 हजार 707 मतदारांपैकी 55 हजार 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निकालाअंती कृष्णचंद्र भोईटे यांना 24 हजार 749 तर श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांना 22 हजार 979 मते मिळाल्याने अवघ्या 1 हजार 770 मतांनी कृष्णचंद्र भोईटे या निवडणूकीत विजयी झाले होते. बाजीराव जगताप यांना 1856, बी.ए.खरात यांना 1136, डब्ल्यु.व्ही.पवार यांना 943 तर आर.जी.चव्हाण यांना 775 मते प्राप्त झाली होती.

विधानसभा निवडणूक : सन 1972

सन 1972 साली फलटण विधानसभा मतदारसंघाने चौरंगी लढत पाहिली. या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून कृष्णचंद्र भोईटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बाजीराव जगताप यांना दुसर्‍यांदा संधी देण्यात आली होती. तर भारतीय जनता संघाकडून व्ही. रामचंद्र सोनवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विश्वनाथ किरवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दि.5 मार्च 1972 रोजी झालेल्या मतदानावेळी 88 हजार 983 मतदारांपैकी 55 हजार 256 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी कृष्णचंद्र भोईटे यांना 36 हजार 827 मते मिळाली होती. बाजीराव जगताप यांना 7 हजार 144, व्ही.रामचंद्र सोनावले यांना 5 हजार 500 तर विश्वनाथ किरवे यांना 1 हजार 46 इतकी मते मिळाली होती. या निवडणूकीत कृष्णचंद्र भोईटे यांनी 29 हजार 683 इतक्या प्रचंड मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवला होता.

विधानसभा निवडणूक : सन 1978

सन 1967 प्रमाणेच सन 1978 ची फलटण विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. या निवडणूकीत श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर विरुद्ध सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्यात रंगतदार लढत झाली. या निवडणूकीच्या रिंगणात एकूण 5 उमेदवार होते. यात जनता पार्टीकडून श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून चिमणराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कडून माधवराव धायगुडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून पैलवान बाजीराव जगताप, तर संभाजी बाबर हे अपक्ष उमेदवार यांचा समावेश होता. दि.25
फेब्रुवारी 1978 रोजी पार पडलेल्या मतदानावेळी 1 लाख 530 मतदारांपैकी 76 हजार 173 मतदारांनी मतदान केले. निकालाअंती श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांना 32 हजार 11, चिमणराव कदम यांना 30 हजार 539 मते मिळाली आणि श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर हे 1 हजार 472 मतांनी विजयी झाले. माधवराव धायगुडे यांना 7 हजार 41, पैलवान बाजीराव जगताप यांना 2 हजार 533, संभाजी बाबर यांना 1 हजार 530 इतकी मते मिळाली होती.

विधानसभा निवडणूक : सन 1980

सन 1980 साली फलटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु) कडून सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कडून हिंदूराव नाईक निंबाळकर तर भारतीय जनता पक्षाकडून रखमाजी सरक असे उमेदवार होते. दि.31 मे 1980 रोजी झालेल्या मतदानावेळी 1 लाख 9 हजार 835 मतदारांपैकी 73 हजार 226 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात मतदारांनी चिमणराव कदम यांच्या पारड्यात 46 हजार 210, हिंदूराव नाईक निंबाळकर यांना 22 हजार 908 तर रखमाजी सरक यांना 2 हजार 550 मते दिली. 1978 च्या निवडणूकीत अल्पशा मतांनी पराभूत झालेले चिमणराव कदम या निवडणूकीत तब्बल 23 हजार 302 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते.

विधानसभा निवडणूक : सन 1985

सन 1985 साली झालेल्या फलटण विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात 5 उमेदवार होते. यामध्ये सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम अपक्ष, भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून राजाराम भोसले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून बाबासाहेब मोरे, अहमद काझी – अपक्ष, रखमाजी सरक – अपक्ष यांचा समावेश होता. या निवडणूकीत 1 लाख 25 हजार 189 मतदारांपैकी 91 हजार 338 मतदारांनी दि.3 मे 1985 रोजी झालेल्या मतदानावेळी आपला हक्क बजावला. निकालाअंती चिमणराव कदम यांना 46 हजार 763, राजाराम भोसले यांना 35 हजार 992, बाबासाहेब मोरे यांना 6 हजार 595, अहमद काझी यांना 558 तर रखमाजी सरक यांना 85 मते मिळाली. तब्बल 10 हजार 771 इतक्या मताधिक्याने चिमणराव कदम दुसर्‍यांदा आमदार झाले.

विधानसभा निवडणूक : सन 1990

सन 1990 सालची फलटण विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. या निवडणूकीत मतदार संख्येने 1 लाख 50 हजाराचा आकडा पार केला होता. तर निवडणूक रिंगणात 8 उमेदवारांनी एकमेकांना आव्हान दिले होते. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, अपक्ष उमेदवार सुभाषराव शिंदे आणि भारतीय जनता पक्षाकडून उभे असलेले डॉ.विजयराव बोरावके या तिघांमध्ये ही प्रमुख लढत होती. जनता दलाकडून सुभाषचंद्र कोळपे, अपक्ष म्हणून दस्तगीर मेटकरी, कुंदन मारुडा, दूरदर्शी पार्टी कडून नामदेव शिंदे हे अन्य उमेदवार होते. दि.27 फेब्रुवारी 1990 रोजी पार पडलेल्या मतदानप्रक्रियेत 1 लाख 59 हजार 171 मतदारांपैकी 1 लाख 13 हजार 618 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निकालाअंती चिमणराव कदम यांना 54 हजार 620, सुभाषराव शिंदे यांना 24 हजार 915, विजयराव बोरावके यांना 24 हजार 518, सुभाषचंद्र कोळपे यांना 4 हजार 470, दस्तगीर मेटकरी यांना 2 हजार 401, कुंदन मारुडा यांना 417, सुरेश चौहान यांना 331 तर नामदेव शिंदे यांना 135 मते मिळाली. या निवडणूकीत 29 हजार 705 मतांचे मताधिक्य घेत चिमणराव कदम सलग तिसर्‍यांचा आमदार म्हणून विजयी झाले.

विधानसभा निवडणूक : सन 1995

सन 1995 सालची फलटण विधानसभा निवडणूकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम अशी प्रमुख लढत पहायला मिळाली. या निवडणूकीत श्रीमंत रामराजे हे अपक्ष उमेदवार होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून चिमणराव कदम, भारतीय जनता पक्षाकडून विष्णू त्रिपूटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बाजीराव जगताप, जनता दलाकडून सुभाष मोहिते तर संपत काळे यांची अपक्ष उमेदवारी होती. दि.12 फेब्रुवारी 1995 रोजी झालेल्या मतदानावेळी 1 लाख 68 हजार 588 मतदारांपैकी 1 लाख 35 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निकालाअंती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना 84 हजार 816, चिमणराव कदम यांना 42 हजार 367, विष्णू त्रिपूटे यांना 3 हजार 352, बाजीराव जगताप यांना 1 हजार 345, संपत काळे यांना 457, सुभाष मोहिते यांना 328 मते मिळाली. या निवडणूकीत श्रीमंत रामराजे हे 42 हजार 449 इतक्या भरघोस मताधिक्याने निवडून आले.

विधानसभा निवडणूक : सन 1999

सन 1999 सालच्या फलटण विधानसभा निवडणूकीत तिरंगी लढत पहायला मिळाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रीय काँग्रेसकडून सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांनी तर शिवसेनेकडून आनंदराव शेळके – पाटील यांनी आव्हान दिले होते. दि.11 सप्टेंबर 1999 रोजी झालेल्या मतदानात 1 लाख 68 हजार 356 मतदारांपैकी 1 लाख 25 हजार 729 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दि.6 ऑक्टोबर 1999 रोजी झालेल्या मतमोजणीअंती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना 63 हजार 960, चिमणराव कदम यांना 32 हजार 180, आनंदराव शेळके – पाटील यांना 23 हजार 395 इतकी मते मिळाल्याचे जाहीर झाले. यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे 31 हजार 780 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.

विधानसभा निवडणूक : सन 2004

सन 2004 च्या फलटण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत तालुक्यातील विद्यमान एकमेकांचे राजकीय विरोधक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत रंगली होती. दि.13 ऑक्टोबर 2004 रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत 1 लाख 98 हजार 869 मतदारांपैकी 1 लाख 34 हजार 565 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दि.16 ऑक्टोबर 2004 रोजी जाहीर झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना 82 हजार 632, शिवसेनेकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 41 हजार 978, राष्ट्रीय समाज पक्षाकडून डॉ.उत्तमराव शेंडे यांना 4 हजार 984, लोकराज्य पार्टीकडून अरविंद सूळ यांना 2 हजार 312 तर अपक्ष उमेदवार सचिन शिंदे यांना 2 हजार 191 मते मिळाली. यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे 40 हजार 945 मतांनी विजयी होवून सलग तिसर्‍यांदा विधानसभेवर आमदार झाले.

विधानसभा निवडणूक : सन 2009

अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव झाल्यानंतर पार पडलेल्या सन 2009 च्या फलटण विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणूकीत तब्बल 21 उमेदवार रिंगणात उतरले होते. दि.13 ऑक्टोबर 2009 रोजी झालेल्या मतदानात 2 लाख 74 हजार 690 मतदारांपैकी 1 लाख 52 हजार 367 मतदारांनी मतदान केले.
मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिपक चव्हाण यांना 71 हजार 506, शिवसेनेच्या बाबूराव माने यांना 31 हजार 592, अपक्ष उमेदवार पोपटराव काकडे यांना 24 हजार 672, राष्ट्रीय समाज पक्षाच्या चंद्रकांत आढाव यांना 7 हजार 695, आरपीआयच्या अमोल आवळे यांना 2 हजार 281, अपक्ष उमेदवार लक्ष्मण माने यांना 1 हजार 718, अपक्ष नामदेव खुडे यांना 1 हजार 465, बहुजन समाज पक्षाचे सुंदर कांबळे यांना 1 हजार 363, अपक्ष विनोद मोरे 1 हजार 134, अपक्ष राहुल अहिवळे 1 हजार 89, अपक्ष विश्‍वास दैठणकर 1 हजार 14, अपक्ष प्रमोद रणवरे 979, अपक्ष दत्तात्रय एडवे 976, अपक्ष चंद्रकांत साळवी 928, अपक्ष बाळकृष्ण काकडे 807, अपक्ष धोंडीराम खरात 632, अपक्ष नामदेव आवळे 577, अपक्ष राजेश आगवणे 540, अपक्ष औदुंबर जगताप 513, अपक्ष पोपटराव माने 413, अपक्ष अनिल आगवणे 393 अशी मते उमेदवारांना मिळाली होती. या निवडणूकीत दीपक चव्हाण हे 39 हजार 914 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

विधानसभा निवडणूक : सन 2014

सन 2014 च्या फलटण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीतही तब्बल 15 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिगंबर आगवणे अशी प्रमुख लढत रंगली. 3 लाख 6 हजार 204 मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात मतदानावेळी 2 लाख 659 मतदारांनी मतदान केले. यात दीपक चव्हाण यांना 92 हजार 910, दिगंबर आगवणे 59 हजार 342, स्वाभिमानीचे उमेदवार पोपटराव काकडे यांना 24 हजार 529, शिवसेनेचे डॉ.नंदकुमार तासगावकर यांना 15 हजार 704, बहुजन समाज पक्षाचे प्रा.दादासाहेब गायकवाड यांना 1 हजार 610, अपक्ष विजय भिसे यांना 1 हजार 128, भारिप बहुजन महासंघाचे शामराव काकडे यांना 891, अपक्ष विनोद मोरे यांना 767, रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत साळवी यांना 551, अपक्ष राहुल अहिवळे यांना 431, अपक्ष उमेदवार दिपक चव्हाण यांना 362, अपक्ष कृष्णा यादव यांना 289, अपक्ष अरविंद आगवणे यांना 284 तर नोटा ला 1 हजार 656 मतदारांनी आपली पसंती दर्शवली. निकालाअंती राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपक चव्हाण 33 हजार 568 इतक्या मताधिक्याने विजयी ठरले.

विधानसभा निवडणूक : सन 2019

सन 2019 च्या फलटण विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा दिगंबर आगवणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर तगडे आव्हान दिले. या निवडणूकीत 12 उमेदवार उतरले होते. दीपक चव्हाण यांना 1 लाख 17 हजार 617 मते मिळाली तर दिगंबर आगवणे यांना 86 हजार 636 मतदारांनी आपली पसंती दर्शवली. यात 30 हजार 981 मतांचे मताधिक्य मिळाल्यामुळे दिपक चव्हाण तिसर्‍यांदा विधानसभेवर विजयी झाले. निवडणूकीतील अन्य उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अरविंद आढाव यांना 5 हजार 460, बहुजन समाज पक्षाचे प्रदिप उर्फ प्रेम मोरे यांना 934, अपक्ष कांचनकन्होजा खरात यांना 780, अपक्ष चंद्रकांत अहिवळे यांना 739, अपक्ष नंदकुमार मोरे यांना 673, प्रजासत्ताक भारत पक्षाचे अमोल पवार यांना 342, अपक्ष चंद्रकांत साळवी यांना 308, अपक्ष अमोल कारडे यांना 216, अपक्ष पांडु अहिवळे यांना 182 मते मिळाली. 3 लाख 32 हजार 673 मतदारांपैकी 2 लाख 15 हजार 987 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आता वेध सन 2024 च्या निवडणूकीचे

संपूर्ण फलटण विधानसभा मतदारसंघाला आता आगामी निवडणूकीचे वेध लागले असून त्या अनुषंगाने या – ना त्या प्रकारे प्रचारयंत्रणा कामाला लागल्या आहेत. सभा, समारंभ, कार्यकर्ता मेळावे, रोजगार मेळावे, विकासकामांची उद्घाटने, श्रेयवाद, कार्यकर्त्यांचे पक्षांतर अशा उपक्रमांना मतदारसंघात वेग आला आहे. राज्यपातळीवर झालेल्या राजकीय उलथापालथीचे व आघाड्यांच्या बिघडलेल्या समीकरणांचे परिणाम मतदारसंघात देखील दिसत असून पक्षीय पातळीवर ठरणार्‍या युत्या, आघाड्यांचा धर्म फलटणमध्ये पाळला जाईल कां? आयत्या वेळेला दिग्गज नेते मंडळी पक्षांतराच्या उड्या घेतील कां? सत्ताधार्‍यांकडून विद्यमान उमेदवार बदलले जातील कां? विरोधी पक्षातून तुल्यबळ लढत मिळेल कां? या सगळ्या प्रश्‍नांसह आगामी निवडणूकीबाबत उत्कंठा शिगेला पोचली आहे.

निवडणूक माहिती संदर्भ : भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली सांख्यिकी अहवाल.

(लेखक साप्ताहिक लोकजागरचे संपादक आहेत.)


Back to top button
Don`t copy text!