फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी


दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । फलटण । कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून संचालक मंडळावर १८ संचालक निवडून द्यावयाचे आहेत.

या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार दि. २७ मार्च ते दि. ३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणे, दि. ५ एप्रिल रोजी सर्व दाखल उमेदवारी अर्जांची छाननी दुपारी १२ वाजले पासून छाननी संपेपर्यंत, दि. ६ ते २० एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात (निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण यांचे कार्यालय राहील.) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध करणे आणि उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आणि त्यानंतर अर्ध्या तासाने मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (मतदान व मतमोजणी ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.)

सोसायटी मतदार संघ ११ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण ७, महिला २, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती जमाती १. ग्रामपंचायत मतदार संघ ४ संचालक निवडून द्यावयाचे त्यापैकी सर्वसाधारण २, अनुसूचित जाती जमाती १, आर्थिक दुर्बल १.
व्यापारी अडते मतदार संघ २ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. हमाल मापाडी मतदार संघ १ संचालक निवडून द्यावयाचा आहे. असे एकूण १८ संचालक निवडून द्यावयाचे आहेत. सोसायटी व ग्रामपंचायत मधील शेतकरी सदस्य सदर निवडणूक लढवू शकतात.
मतदार संघ निहाय मतदार संख्या खालीलप्रमाणे – सोसायटी मतदार संघ १६३४, ग्रामपंचायत मतदार संघ ११८७, व्यापारी व अडते ८२, हमाल मापाडी ३९ असे एकूण २९४२ मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी
तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण आणि प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण सुनिल धायगुडे यांनी सदर निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यावेळी बाजार समिती सचिव शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.
आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी तहसीलदार यांचा दाखला आवश्यक तर आरक्षित जागांसाठी जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पत्र आवश्यक आहे. त्याचप्रमाणे २१ वर्षे पूर्ण असल्याचा वयाचा पुरावा तसेच रहिवासी व शेतकरी असल्याचा पुरावा दाखल करावा लागणार आहे. उमेदवार सूचक व अनुमोदक हे मतदार यादीतील असायला हवेत आणि प्रत्येकाला एक वेळ सूचक किंवा अनुमोदक होता येईल.


Back to top button
Don`t copy text!