दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सध्या फलटण आगाराची दयनीय अवस्था झाली आहे. आगारातील बहुतेक गाड्या खटारा झाल्या आहेत. त्यामुळे पुणे, कोकणात, सातारला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध नाहीत किंवा ज्या गाड्या सोडतात, त्या मधेच बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून आगारातील अधिकारी व कर्मचारी प्रवाशांना बारामती डेपोला जाण्याचा सल्ला देत आहेत. हे म्हणजे ‘आपल गाढव दुसर्याच्या घरी बांधण्यासारखं’ चाललं आहे. याची संबंधितांनी लवकरात लवकर दखल घेऊन फलटण आगाराचा प्रवाशांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
याबाबत प्रवाशांनी दिलेली माहिती अशी, फलटण आगाराची सध्या परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. फलटण बस स्टँड सध्या फक्त शोभेची वस्तू झाली आहे. सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान फक्त एकच बस सातारा येथे सोडली. तीसुध्दा जनरल बस, म्हणजे ज्यांना काही महत्त्वाचे काम आहे त्यांना सातारा केव्हा येईल, याचीच वाट पाहत बसमध्ये बसावे लागत आहे. सातारला खूप कमी बस आहेत. त्या सगळ्या जुन्या आणि भंगार गाड्या दोन-अडीच तास लावतात सातारला जायला, असा अनुभवा प्रवाशांनी सांगितला आहे.
पुणे स्टेशनला जाण्यासाठी फलटण आगारातून जाणार्या बस एवढ्या हळू जातात की प्रवाशी बेहाल होतात. पुणे स्टेशनवर, स्वारगेट, मुंबईकडे फलटणवरून जाणार्या बस दिवे घाट चढून गेल्यावर सतत बंद पडत आहेत. काही महिन्यापूर्वी फलटणवरून गेलेली एक गाडी दिवे घाटात बंद पडली होती. थंडीच्या दिवसात १ तासाहून अधिक वेळ रात्री प्रवासी दुसर्या गाडीची वाट पहात होते.त्यामध्ये वयस्कर महिला भगिनी, लहान मुले बेजार झाली होती. या गाडीचा काटा ६० वर लॉक केल्यामुळे दिवे घाट चढनेसुद्धा या बसला अवघड झाले होती. त्यात ही बस जेवायलाही त्यानंतर एका ठिकाणी थांबली. म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, असेच म्हणावे लागेल. कोठे नेेेवून ठेवला आहे फलटणचा बस डेपो, असे प्रवाशी म्हणू लागले आहेत.
फलटण डेपोमधून १९ गाड्या रत्नागिरीसाठी सोडणार होते, मुलाला पुण्याला जायचे होते, मी सव्वातास स्टँडवर थांबल्यावर मला परिस्थिती कळली. म्हणून मी सरळ बारामतीला गेलो आणि त्याला बसमध्ये बसविले. याबाबत आम्ही डेपोकडे अर्ज देऊन थकलो पण कोणी लक्ष देत नाही, तक्रारीची दखल घेतली जात नाही, असे एका प्रवाशाने सांगितले.
आम्हाला रेल्वे प्रवास करायचा होता, स्वारगेट गाडीत बसून पुलगेटला चढलो, पुलगेटवरून पुणे स्टेशनला जाण्यासाठी १ तास लागला, कॅब रिक्षाने प्रवास करताना माझी पुढील रेल्वे जोधपूर गाडी हुकली, असेही प्रवाशाने सांगितले.
फलटणवरून पुण्याला मी येत होतो. दुपारी १.४५ ला बस फलटणमधून निघाली. जेजुरी येथे चढ आहे, तिथे बस बंद पडली, स्टार्टर बसत नसल्याने पाठीमागील वाहने बाजूला काढून रिव्हर्समध्ये बस सुरू केली, त्यानंतर फुरसुंगीमध्ये परत बंद पडली. ट्रॅफिकमध्ये आणि ती सुरू करण्यासाठी पाऊणसात आम्ही उतरलो आणि पाठीमागील वाहने बाजूला करून रिव्हर्समध्ये परत सुरू केली.असच करत शेवटी ७ वाजता बस हडपसरला पोहोचली. हडपसरला सगळ्यांना सांगण्यात आले, बस येथून पुढे जाणार नाही. दुसर्या बसमध्ये अॅडजस्ट करू. परंतु अगोदरच २-३ बस दिवे घाटानंतर बंद पडलेल्या होत्या, त्यांनाच जागा मिळत नव्हती. दुपारी १.४५ ते सायंकाळी ७ एवढा वेळ लागला पुण्याला पोहोचण्यासाठी. अशी अत्यंत दयनीय अवस्था फलटण आगारातील बसगाड्यांची बनली आहे, असे प्रवाशाने सांगितले.