फलटणमध्ये ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू; २०० हून अधिक सहभाग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू झाले असून, २०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 25 नोव्हेंबर : सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग व श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू झाले आहे. हे तीन दिवसीय प्रदर्शन 25, 26 व 27 नोव्हेंबर रोजी चालणार असून, जवळपास 200 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.

उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण व भारतरत्न डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून उद्घाटन समारंभाची सुरुवात करण्यात आली. यावेळी फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले, उपसभापती अमोल दशरथ सस्ते, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई मोरे, वैशालीताई कांबळे, पंचायत समिती सदस्य कारंडे, सचिन अभंग, विजया हनुमंत सोनवलकर, योगिता गायकवाड, फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सी.जी मठपती, बीआरसी तालुका समन्वयक दमयंती कुंभार, शिक्षण विस्तार अधिकारी संकपाळ, केंद्रप्रमुख लोखंडे, जाधव, दडस, शरद जाधव व अतिश पवार उपस्थित होते.

मान्यवरांची मनोगते आणि प्रकाशन अनावरण

फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी सांगितले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य घडविणारे नागरिक आहेत आणि त्यांनी बनवलेल्या छोट्याशा उपकरणात देशाचे भविष्य घडवण्याची ताकद आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्नवादी विचार अंगीकारणे गरजेचे असून, विद्यार्थी प्रगती हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभागी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधक वृत्ती व सर्जनशीलता जोपासावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथील विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘मोकळा श्वास’ पर्यावरण हस्तलिखित आणि सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल फलटण येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी पिंकी निषाद हिने काढलेले डॉ. सी व्ही रमण यांचे स्केच मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल दशरथ सस्ते यांनी विज्ञानाचे महत्त्व, विज्ञानामुळे जीवन कसे सुखकारक होते हे सांगून स्वागत सत्कार प्रसंगी देण्यात आलेल्या छोट्या वृक्ष रोपांचे कौतुक केले व पर्यावरण जागरूकतेचा संदेश दिला.

गटशिक्षणाधिकारी सी.जी मठपती यांनी प्रास्ताविकातून विज्ञान प्रदर्शनाचा हेतू व उद्देश स्पष्ट केला आणि तालुक्यातून विविध शाळांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी सर्व विद्यार्थी स्पर्धकांचे अभिनंदन केले, विद्यार्थी दशेतील विज्ञान प्रदर्शनाचे अनुभव सांगितले आणि संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे, असे मत मांडले. तसेच संस्थेकडून भविष्यातही उत्कृष्ट पद्धतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

स्पर्धा गुणगौरव, नियोजन आणि सूत्रसंचालन

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राबविण्यात आलेल्या तालुकास्तरीय खाजगी व्यवस्थापन विभागातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या शाळांचा नामोल्लेख करून अभिनंदन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचे नियोजन गटशिक्षणाधिकारी सी.जी मठपती, तालुका समन्वयक दमयंती कुंभार, प्रशालेच्या प्राचार्या गायकवाड एन एम, उपप्राचार्य घनवट पी.डी व सर्व विभाग प्रमुख यांनी केले.

विज्ञान प्रदर्शनाचे स्वागत गीत व विज्ञान गीत वाघ जी.बी यांनी सादर केले. उत्तम फलक लेखन कला शिक्षिका ढेंबरे व कलाशिक्षक यु एम कुंभार यांनी केले, तर प्रशालेतील सर्व महिला शिक्षिकांनी वैज्ञानिक रांगोळी काढली. या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन यादव एस डी, राऊत एस एन, तगारे एस एम व सुजाता पवार यांनी केले, तर शास्त्र विभाग प्रमुख साळुंखे पी.व्ही यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!