पावसाळ्या आधीच परशुराम घाट ‘सुसाट’!, १० मे पर्यंत घाटातील वाहतूक बंद राहणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । चिपळूण । मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाट दिवसातील पाच तास बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसात घाटातील अतिशय धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पुर्ण करून तातडीने कॉक्रिटीकरणाच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी घाटातील काम पूर्ण करून दोन्ही लेनवर वाहने सुसाट जाण्याची शक्यता आहे.

परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मिटर अंतरातील डोंगर कटाई व सरंक्षण भितीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून घाट बंद ठेवून कल्याण टोलवेज कंपनीने अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. त्यासाठी घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात घाट बंद ठेवून काम सुरू केले आहे.

घाटाच्या मध्यवर्ती भागात कडक कातळ लागल्याने तो तोडताना अनेक अडचणी येत आहेत. दोन ब्रेकर मशिनने हे कातळ तोडण्याचे काम सुरू केले आहे. परंतू तो खडक अतिशय कठिण असल्याने या कामात अडचणी येत आहेत. त्यासाठी बाजूचा नरम कातळ फोडून ताप्तुरत्या स्थितीत पर्यायी रस्ता काढला जात आहे. कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची आवश्यकता आहे. परंतू घाट माथ्यावर वस्ती असल्याने त्याला अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ब्रेकरने कातळ फोडण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वाहतूक

परशुराम घाटातील वाहतूक पाच तास बंद असल्याने या मार्गावरील वाहने चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्यात येत आहेत. त्यासाठी कळंबस्ते व परशुराम घाटात पोलिस छावणी उभारण्यात आली आहे. काही अवजड वाहने परशुराम घाटाच्या पायथ्याशीच उभी करून ठेवली जात आहेत. या वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. सायंकाळी ५ वाजता घाट खुला होताच ही वाहने सोडली जाणार आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत सुचवलेल्या उपाययोजना नाहीत

परशुराम घाट बंदच्या पार्श्वभुमीवर दोन्ही बाजूला फलक उभारण्यात आले आहेत. परंतू त्या व्यतिरीक्त आपत्कालीन परिस्थितीत सुचवलेल्या उपाययोजना ठेकेदार कंपनीकडून केलेल्या दिसत नाहीत. दरडग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्नीशामक वाहन, इत्यादी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करावी. जबाबदार अधिकाऱ्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचाव कार्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावे. रस्त्याच्या बाजुस रिफ्लेक्टर लावण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. परंतू अद्यापही या सूचनांचे पालन होताना दिसत नाही.


Back to top button
Don`t copy text!