
स्थैर्य, फलटण, दि.१ : वडले ता. फलटण येथे रविवार दि. २९ रोजी सायंकाळी गुन्ह्याच्या तपासा दरम्यान संशयीत आरोपींच्या शोधात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या दिशेने झाडण्यात आलेल्या गावठी पिस्तूलातील गोळ्यांमुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांचे वेशात येवून सराफाचे दुकान गोळीबार करत लुटणारे, तसेच वडगाव निंबाळकर, ता. बारामती पोलीस ठाण्याचे हद्दीत सराफ दुकानदाराला लुटणारे टोळीतील संशयीत आरोपीचा सुगावा लागलेने आज (रविवार) त्यांचा पाठलाग करताना फलटण जवळ वडले गावात वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत दरोडेखोराला ताब्यात घेतले असून दोन संशयीत पप्पु उर्फ सुहास सोनवलकर रा. वडले ता. फलटण व प्रमोद ऊर्फ आप्पा ज्ञानदेव माने रा. तामशेतवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर यांच्या शोधात असलेल्या पोलीसांचे दिशेने गोळीबार करुन ऊसाचे शेतात पसार झाले आहेत. यामध्ये सर्व पोलीस पथक सुखरुप असून कोणलाही इजा झाली नसल्याचे सांगून फरार आरोपीचा शोध पुणे ग्रामीण व फलटण पोलीस करीत असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सांगितले.
सदर घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल निवृती भुजबळ (बक्कल नंबर २७०७, रा. वाल्हे, ता. पुरंदर जि. पुणे यांनी दिले फिर्यादीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०७, ३५३, ३४ आर्म एक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण तानाजी बरडे यांनी गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून तपास कामी सुचना दिल्या आहेत, तसेच पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी संशयीत आरोपीचा शोध घेणे कामी प्रयत्न सुरु केले आहेत. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.