७ नोव्हेंबरला ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’; २० दिवसांच्या प्रवासानंतर मंत्रालयावर धडक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, पंढरपूर, दि.३१: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मुंबई मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. ७ नोव्हेंबरला या मोर्चाला पंढरपूरमधून सुरुवात होणार आहे. २० दिवसांचा पायी प्रवास करत सर्व आंदोलक मंत्रालयावर धडक देणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आली आहे. हा मोर्चा सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही, अशा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तुळजापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारला १५ दिवसांचं अल्टिमेटम दिलं गेलं होतं. त्याला २१ दिवस उलटून गेले तरीही सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आलं. एकूण २० दिवस हा मोर्चा असणार आहे. रोज २० ते २५ किलोमीटर अंतर पार करण्यात येईल. मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य या आंदोलनात सहभागी होणार आहे.

पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई असा जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!