स्थैर्य, वडूज, दि. 19 : जगभरातील करोनाच्या महामारीने भयभीत झालेल्या राज्यातील स्थानिकांसह परप्रांतीयांचे लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाच्या धोरणानुसार परप्रांतीयांचा स्वगृही जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून खटाव तालुक्यातील शेकडो परप्रांतीय रवाना झाले. जाताना ते भावूक झाले होते. परंतु एकीकडे घरी जाण्याची उत्सुकता तर दुसरीकडे तिकडे जावून करायचे काय? ही चिंता त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीत घडलेल्या या परप्रांतीयांनी जाताना आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा, ही भूमिका घेत माणुसकी हाच एकमेव धर्म याचा प्रत्ययच जणू दाखवून दिला.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शासनाने खबरदारी म्हणून गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊनचा पर्याय निवडला. या काळात कामधंदे बंद असल्याने इच्छुक संबंधितांना स्वगृही पाठविणे हा निर्णय शासनाला घ्यावा लागला. करोना संर्सगाची साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर स्वर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून मुळगावी जाण्यास परवानगी रितसर दोन्ही राज्याचा समन्वय साधून घेतलेला निर्णय होय. इतर राज्यातून रोजी-रोटीसाठी दाखल झालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासनाने दिलेल्या परवानगीने त्यांच्यात उत्साह होता. शेकडो लोक राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथून येवून कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करीत होते. परप्रांतीयांना परतीच्या प्रवासासाठी जाण्यासाठी शासनाने ऑनलाईन परवानगी व आरोग्य तपासणी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर नेटके नियोजन केले होते. यावेळी तहसील कार्यालय, वडूज नगरपचांयत, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी उत्कृष्टपणे संघटनात्मक काम केले. त्यामुळे खटाव तालुक्यातील परप्रातीयांना निरोप देताना व घेताना अनेकजण भावुक होऊन संभाषण करीत होते. तर निरोप घेताना काही परप्रांतीयांना अश्रू अनावर झाले. हीच आपली कर्मभूमी म्हणजेच जन्मभूमी समजून वास्तव्य केलेल्या परप्रांतीयांना निरोप घेताना फार अवघड वाटत होते. प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचार्यांनी परप्रांतीयांची त्यांच्या स्वगृही रवानगी करताना आवश्यक ती खबरदारी घेवून जबाबदारी पार पाडली. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील एसटी आगारामधून आजपर्यंत 455 परप्रांतीय त्यांच्या मुळ गावी रवाना झाले.
आत्तापर्यत खटाव तालुक्यातून मध्यप्रदेशला 21, राजस्थानला 94 आणि उत्तरप्रदेशला 340 असे एकूण 455 परप्रांतीय रवाना झाले. यावेळी या सर्वांना प्रशासनाच्यावतीने जेवणाचे पॅकींग, पाणी बॉटल, बिस्किट पुडे व लाडूचिवडा असे साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नायब तहसीलदार कमलाकर भादुले, नगरसेवक वचन शहा आदीसह महसूल विभाग व नगरपचांयत कर्मचारी कार्यरत होते. आजअखेर वडूज आगाराच्या 20 बस मधून 455 परप्रांतीयांना सातारा (माहुली) रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आले.
खटाव तालुक्यातुन सुमारे चाळीस जण उत्तर प्रदेशला जाण्यासाठी वडूज आगारात आले होते. यावेळी काही परप्रांतीयांनी तहसीलदार अर्चना पाटील यांचे आभार मानून मनापासून धन्यवाद दिले. त्यावेळी तहसीलदार पाटील यांनी हे आमचे आद्यकर्तव्यच असल्याचे सांगून शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही केल्या.