फलटणमध्ये आजपासून ‘शायनिंग महाराष्ट्र’ प्रदर्शनाचे आयोजन

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार : तीन दिवस चालणार प्रदर्शन; केंद्र सरकारच्या सर्व योजना एकाच छताखाली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कल्पकतेतून दिल्ली येथील सांसा फाउंडेशनच्या वतीने फलटण येथील ‘शुभारंभ लॉन्स’ येथे सोमवार, दि. १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी यादरम्यान ‘शायनिंग महाराष्ट्र २०२४’ या तीनदिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून हे प्रदर्शन होत असल्याची माहिती फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष सचिन कांबळे – पाटील यांनी रविवारी पत्रकारांना दिली.

कांबळे-पाटील पुढे म्हणाले की, सोमवार, दि. १९ रोजी सकाळी ११ वाजता सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून भाजपाचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अ‍ॅड. नरसिंह निकम, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष तुकाराम शिंदे, फलटण नगर परिषद गटनेते अशोकराव जाधव, विधानसभा प्रभारी विश्वासराव भोसले, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष अनुप शहा, किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर, महादेव अलगुडे, महादेव पोकळे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनामध्ये भारत सरकारच्या कृषी विभाग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, डीआरडीओ, भूजल सर्वेक्षण, आयुष, भारतीय रिझर्व्ह बँक, नॅशनल केमिकल फर्टीलायझर, खादी उद्योग, राष्ट्रीय बांबू मिशन, राष्ट्रीय मानक बुरो, हातमाग, ताग उद्योग, हस्तकला उद्योग अशा भारत सरकारच्या विविध खाती आणि उपक्रमांचे स्टॉल्स मांडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी याबाबतची माहिती लोकांना सांगणार आहेत. विद्यार्थी, महिला, नागरिक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटाच्या नागरिकांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत असणार आहे. देश पातळीवरील या प्रदर्शनाचा फलटणमधील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बजरंग गावड़े, अमोल सस्ते, संतोष गावड़े, सनी मदने, उषा राऊत यांनी केले आहे.

संरक्षण विभागाचे शस्त्रसाहित्य राहणार खास आकर्षण !

केंद्र सरकारच्या वतीने देशवासीयांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांची माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांना व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात संरक्षण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संरक्षण साहित्याच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!