भीषण दुष्काळात महात्मा फुलेंनी उभारले ‘व्हिक्टोरिया बालाश्रम’; शेतकऱ्यांसाठीचे ऐतिहासिक सेवाकार्य आजही प्रेरणादायी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

१८७६-७८ च्या भीषण दुष्काळात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी बालाश्रमाच्या माध्यमातून केलेले सेवाकार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २९ ऑक्टोबर, हेमंतकुमार चव्हाण (जिल्हा माहिती अधिकारी, सातारा) : महाराष्ट्रात १८७६-७८ च्या काळात पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना आणि अनाथ बालकांना मदतीचा हात देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी ‘व्हिक्टोरिया बालाश्रम’ची स्थापना केली होती. संकटाच्या काळात केवळ सहानुभूती न दाखवता सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले हे ऐतिहासिक मदतकार्य आजही समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.

दुष्काळग्रस्त बालकांना आधार

महात्मा फुले यांच्यासाठी शेतकरी हा केवळ अन्नधान्य पिकवणारा घटक नव्हता, तर तो समाजाचा मुख्य आधार होता. दुष्काळामुळे विहिरी आटल्या, शेतात पिके उगवेनाशी झाली आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या कठीण काळात अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या निराधार बालकांना आधार मिळावा, यासाठी त्यांनी १७ मे १८७७ रोजी पुणे नगरपालिकेतील कार्याचा उपयोग करत ‘व्हिक्टोरिया बालाश्रम’ सुरू केले.

सावित्रीबाई फुले यांचे योगदान

या मदतकार्यात सावित्रीबाई फुले यांचेही मोठे योगदान राहिले. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी दुष्काळग्रस्त भागांत प्रत्यक्ष जाऊन अन्न, पाणी आणि कपड्यांचे वाटप केले. भुकेलेल्यांना अन्न आणि निराधारांना निवारा देण्याचे हे कार्य फुले दाम्पत्याने कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता अत्यंत निष्ठेने पार पाडले.

‘शेतकऱ्याचा असूड’मधून मांडली भूमिका

दुष्काळाव्यतिरिक्त महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे दारिद्र्य, कर्जबाजारीपणा आणि शिक्षणाचा अभाव या प्रश्नांवर सातत्याने विचार केला. ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. शेतकऱ्याच्या श्रमाचा सन्मान करत गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याची महात्मा फुले यांची शिकवण वर्तमान परिस्थितीतही तितकीच महत्त्वाची आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!