स्थैर्य, मुंबई, दि. ४: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात बसून काम करण्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. या टीकांचे उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच असल्याचं म्हटलं होतं. आता यावरुन भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावं असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी याविषयी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच असं राऊत म्हणाले… कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा.’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
राऊत म्हणाले होते की, राज्यभर संपूर्ण मंत्रिमंडळ फिरत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे सर्व टाळता यावे यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करायचे हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवर बसून जास्त काम केले जाऊ शकते. डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच असल्याचंही राऊत म्हणाले.